राजकारणाची जाण आणि सामाजिक भान असलेले नेतृत्व हरपले! आ. श्वेताताई महालेंनी स्व.अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा! चिखलीत सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा संपन्न..
Feb 2, 2026, 18:51 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, राज्याने एक अनुभवी, कर्तृत्ववान आणि जनतेसाठी सतत झटणारे नेतृत्व गमावले आहे.या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यासाठी आज,दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता चिखली येथील शिवाजी कला मंदिर, शिवाजी हायस्कूल येथे शोकसभा व श्रद्धांजली सभा संपन्न झाली.
यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की "राजकारणाची जाण आणि सामाजिक भान असलेले दूरदृष्टीचे नेतृत्व महाराष्ट्राने गमावले आहे. अजितदादांचे कार्य, त्यांची कार्यपद्धती आणि जनतेशी असलेली आपुलकी कायम स्मरणात राहील."
सभेमध्ये इतर मान्यवरांनीही अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या साधेपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावर असलेली पकड याविषयी अनेक प्रसंग कथन करण्यात आले.
शेवटी सर्व उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून दिवंगत नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण वातावरण शोकमय झाले असून, उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू आणि मनात दुःखाची भावना स्पष्टपणे दिसून येत होती.या सभेस चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्यासह काँग्रेसकडून जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोन्द्रे, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते माजी जी. प. अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, शिवसेना नेते श्रीराम झोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष शंतनू बोन्द्रे, मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे,भाजपा उपजिल्हाध्यक्ष देविदास जाधव, संजय गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज दांडगे, भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित भाजपा चिखली तालुका अध्यक्ष डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ, श्री अमोल साठे,श्री अनिल जाधव, नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली..