अजंठा ॲग्रो सर्व्हिसेस सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई! मालक महेश गट्टाणी विरुद्ध गुन्हा दाखल! खतांचा काळाबाजार, बनावट विक्री करून करत होता शेतकऱ्यांची फसवणूक...

 
 बुलढाण (जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या नावावर आधार कार्डचा गैरवापर करून ऑनलाईन ई-पॉस (E-POS) प्रणालीवर खतांची बनावट विक्री दाखवणे, अनुदानित युरिया खताचा काळाबाजार करणे तसेच विनापरवाना आणि मुदतबाह्य कीटकनाशके व खतांचा साठा बाळगल्याप्रकरणी मेहकर येथील अजंठा ॲग्रो सर्व्हिसेस सेंटरचे मालक महेश शामसुंदर गट्टाणी यांच्याविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने ही धडक कारवाई केली.
उकळी (ता. मेहकर) येथील शेतकरी नयन विश्वासराव खरात यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दिली होती. त्यांनी संबंधित दुकानातून सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) खताच्या सहा बॅगा खरेदी केल्या होत्या. मात्र, त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून ई-पॉस मशीनवर त्यांच्या नावे डीएपी (DAP) खताच्या आठ बॅगा आणि २०:२०:०:१३ खताच्या १५ बॅगा खरेदी केल्याचा बनावट संदेश त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाला होता.
या गंभीर प्रकाराची दखल घेत दि. १६ मे २०२६ रोजी जिल्हा भरारी पथकाचे अध्यक्ष तथा मोहीम अधिकारी प्रमोद गायके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश सावंत, तालुका कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक उद्धव शामराव काळे आणि कृषी अधिकारी संदेश गायकवाड यांच्या पथकाने संबंधित दुकानाची प्रत्यक्ष तपासणी केली.
तपासणीदरम्यान शेतकरी नयन खरात यांच्या नावावर ई-पॉस प्रणालीमध्ये खतांची बनावट विक्री नोंदवून शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. तसेच दुकानात ‘BIO-R303 Plus’ आणि ‘Isabion’ या उत्पादनांच्या परवान्याची मुदत संपलेली आढळली. याशिवाय ‘Hunter’, ‘QUICK’ आणि ‘MJ Maharaja Polyhalite’ या खत व औषधांच्या विक्रीसाठी कोणतेही वैध परवाने उपलब्ध नसल्याचे तपासात समोर आले.
ई-पॉस मशीनवरील ऑनलाईन साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावतही आढळून आली. पीपीएल कंपनीचा युरिया ऑनलाईन २१९ बॅगा दाखविण्यात आला असताना प्रत्यक्षात २७६ बॅगा उपलब्ध होत्या. तर एनएफएल कंपनीचा युरिया ऑनलाईन शून्य दाखविण्यात आला असतानाही गोदामात ६९ बॅगा सापडल्या. साठा नोंदवहीदेखील अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले.
अनुदानित युरिया खताची ई-पॉस प्रणालीवर केवळ आभासी विक्री दाखवून प्रत्यक्षात तो अकृषक कामांसाठी अवैधरित्या विकून शासकीय अनुदान लाटण्याचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचे या तपासातून उघड झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी खत निरीक्षक तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक उद्धव शामराव काळे यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी आरोपी महेश शामसुंदर गट्टाणी (प्रोप्रायटर, अजंठा ॲग्रो सर्व्हिसेस सेंटर, मेहकर) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१६, ३३६(३) तसेच रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५, खत वाहतूक व नियंत्रण आदेश १९७३ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा (रजि. नं. ०३४८/२०२६) दाखल केला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत.