देऊळगाव राजा तहसीलदार पथकावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलनाचा इशारा पोलिस आणि आरटीओ विभागाच्या सहकार्याबाबत महसूल कर्मचाऱ्यांची नाराजी; फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी
या पार्श्वभूमीवर गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी तहसीलदार, नायब तहसीलदार आणि विदर्भ पटवारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून घटनेतील दोषी तसेच फरार आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
महसूल प्रशासनाच्या वतीने अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई केली जात असताना पोलिस आणि आरटीओ विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळणे गरजेचे आहे, अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. महसूल पथकांवर अशाप्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होत असेल, तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, फरार आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई न झाल्यास सोमवारपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला आहे. अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले किंवा दबाव आणण्याचे प्रकार यापुढे कदापि सहन केले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
महसूल विभागासोबत पोलिस आणि आरटीओचीही जबाबदारी
अवैध वाळू वाहतुकीविरोधातील कारवाई केवळ महसूल विभागाची जबाबदारी नसून, पोलिस विभाग आणि आरटीओ विभागानेही त्यासाठी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी सांगितले. एकट्या महसूल विभागाला प्रत्येक वेळी तत्परतेने कारवाईसाठी उपस्थित राहणे शक्य नसते. इतर विभागांनीही सहकार्य केल्यास अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करणे अधिक सोपे होईल,
खडकपूर्णा धरणाशी संबंधित जलसंपदा विभागानेही या संदर्भातील जबाबदारी स्वीकारून आवश्यक सहकार्य करावे, अशी अपेक्षा तहसीलदार डोंगरजाळ यांनी व्यक्त केली. जलसंपदा विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.