लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण! शासकीय कार्यालये लाईट बिल भरेना! जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकडे १ कोटी ६७ लाखांचे विज बिल थकीत...

 
 बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) : लोकांना उपदेशाचे डोस पाजायचे आणि स्वतः मात्र कोरडेच रहायचे..यालाच लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असे म्हणतात. आता वाक्यप्रचार लागू झालाय तो जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना.. सामान्य माणसाचे थोडेही लाईट बिल थकले की लाईट कापण्याच्या नोटीस पाठवल्या जातात. बऱ्याचदा लाईट कट केली जाते.. लोकांनी लाईट बिल वेळेवर भरावे यासाठी शासनाकडून वेळोवेळी जनजागृती आणि तशा जाहिराती देखील प्रसारित केल्या जातात. मात्र आता शासनाच्या कार्यालयांनीच लाईट बिल थकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कार्यालयांकडे तब्बल १ कोटी ६७ लाखांचे वीज बिल थकीत आहे. ज्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाकडे सर्वाधिक वीज बिल थकबाकी असल्याचेही समोर आले आहे. पुढील महिन्यात आर्थिक वर्ष संपत असल्याने आता महावितरणने या सर्वच शासकीय कार्यालयांना अल्टिमेटम दिला असून दिलेल्या मुदतीत विज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे..
जिल्ह्यातील १५२४ कार्यालयांकडे १ कोटी ६७ लाख रुपये बाकी आहेत.आर्थिक वर्ष संपत असल्याने महावितरण कडून थकीत विज बिल वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये ज्यांच्याकडे विज बिल थकबाकी असेल त्यांना ग्राहकांना पंधरा दिवसाची नोटीस दिले जाते. दिलेल्या कालावधीत वीज बिल न भरल्यास विज पुरवठा कट केला जाईल अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली. महावितरण कडे जिल्ह्यातील १५२४ शासकीय ग्राहक आहेत त्यांच्याकडे १ कोटी ६७ लाख रुपये थकबाकी आहे. ज्यामध्ये पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाकडे सर्वाधिक थकबाकी आहे. पाणीपुरवठा विभागाचे ग्रामीण भागात एकूण १४८७ कनेक्शन आहेत. त्यांच्याकडे ८३ कोटी एवढी थकबाकी आहे. त्यामध्ये शहरी पाणीपुरवठा मध्ये ३३ कनेक्शन आहेत. त्यांच्याकडे ८१ लाख थकबाकी असल्याची माहिती महावितरण कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे...