देशभक्तांनो एकत्र या! भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी उद्या बुलडाण्यात तिरंगा रॅली; हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ.संजय गायकवाड यांचे आवाहन...
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत उद्या संपूर्ण राज्यभर तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उद्या बुलढाणा शहरात देखील तिरंगा सन्मान रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. एक व्हिडिओ प्रसिद्धीस देऊन आ.गायकवाड यांनी या रॅलीसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. आ..गायकवाड म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांचे निर्णायक युद्ध सुरू आहे. भारताचे जवान प्राणाची बाजी लावून आपल्या देशाच्या नागरिकांचे रक्षण करीत आहेत. गेल्या ३५ वर्षात दहशतवाद्यांनी आपल्या अनेक जवानांना मारले. शेकडो हिंदूंच्या हत्या केल्या, महिलांवर बलात्कार केले. आमच्या जवानांचे शीर कापून नेले, त्यासोबत दहशतवादी फुटबॉल सारखे खेळले. मात्र आता या सगळ्याचा बदला भारतीय जवान जीवाची बाजी लावून घेत आहेत. आमच्या देशाला पहिल्यांदा असे प्रधानमंत्री भेटले आहेत की ज्यांनी केवळ "घूस के मारेंगे" असे म्हटलेच नाही तर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढवण्याकरता, त्यांचे धाडस वाढविण्याकरिता व पाकिस्तानला नामोहरम करण्याची शक्ती त्यांना मिळावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात उद्या तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाण्यात देखील या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून बुलडाणेकरांनी या रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ. गायकवाड यांनी केले आहे.