मानधन थकले, हक्कासाठी एकत्र! बुलढाण्यात अंगणवाडी सेविका व आशा गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन...

 

बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या चार महिन्यांपासून थकीत मानधनासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज अंगणवाडी सेविका व आशा गटप्रवर्तक महिलांनी बुलढाण्यातील टिळक नाट्य क्रीडा मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. आपले निवेदन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सुपूर्त करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. त्यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या:
  • मागील चार महिन्यांचे मानधन त्वरित अदा करावे.
  • कामगारविरोधी चारही श्रम संहितांचा रद्दबातल करावा.
  • अंगणवाडी, आशा गटप्रवर्तक व शालेय पोषण आहार योजनेतील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे.
  • ग्रॅज्युटी व पेन्शन योजना लागू कराव्यात.
  • सर्व कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करावे
  • महाराष्ट्र धन सुरक्षा विधेयक रद्द करावे.
  • खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करावे.
  • किमान वेतन २६ हजार रुपये करण्यात यावे.
कामाचा ताण वाढत असताना मानधन वेळेवर न मिळणे, भविष्याची गैरहमी आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलक सेविका व गटप्रवर्तकांनी केली.