तुरीवर मर राेगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्याने पाच एकरावर चालविला राेटावेटर; अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांवर आणखी एक संकट; मादणी परिसरातील शेतकरी संकटात !
Oct 20, 2025, 10:57 IST
यावर्षी अतिवृष्टीने एकरी कुठे दोन पोते सोयाबीन तर कुठे तीन पोते सोयाबीन, असे उत्पन्न मिळत आहे. त्यातही सोयाबीनला भाव नसल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च निघालेला नाही.
अशात शासनाकडून मिळणारी ताेटकी मदत ती सुद्धा वेळेवर नाही, त्यामुळे अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी सापडलेला असतांना पुन्हा त्यावर नवीन संकट येऊन पडले आहे. जास्त पाण्याने तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मागील पंधरा दिवसापासून तुरीमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी दोन-तीन फवारण्या केल्या व एक वेळेस ड्रिंकिंग केली. तरीही तुरीमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव थांबत नसल्यामुळे शेवटी रोटावेटर फिरविण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे शासनाने त्वरित अर्थीक मदत करण्याची गरज असून खचलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, अन्यथा विदर्भातील शेतकरी कर्जबाजारी होऊन त्याच्यावर आत्महत्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.