"ताटी उघडा ज्ञानेश्वरा...जेव्हा मुक्ताई माऊलींची समजूत काढतात...." मोगरा फुलला चे तिसरे पुष्प ऐकतांना सभागृहात अश्रूंचा "अभिषेक"! गणेश शिंदे म्हणाले,समाज उद्धारासाठी मातृशक्तीचे योगदान मोठे.....

 
Buldhana
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जगत कल्याण साधण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबा जेव्हा संन्याशाचे पोर म्हणून हिणवल्या गेले, समाजाकडून दुखावल्या गेले. त्या एका क्षणी उद्विग्न अवस्थेत गेलेल्या ज्ञानोबा यांनी स्वतःला झोपडीत कोंडून घेतलं. तेव्हा त्यांची समजूत कोण काढणार तर बहिण मुक्ताई धावून आली. आपल्या आर्त स्वरांमध्ये "चिंता क्रोध दूर सारा.. ताटी उघडा ज्ञानेश्वरा" ची अळवणी करत समाज उद्धारासाठी एक प्रकारे ज्ञानोबांना साद घातल्याचा प्रसंग आपल्या निरूपणातून सांगत असताना राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब , अहिल्यादेवी यांचे समप्रमाण उदाहरण देत समाज उद्धारासाठी मातृशक्तीचे योगदान मोठे असल्याचे गणेश शिंदे म्हणाले. 
बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित "मोगरा फुलला"या निरूपणात सोमवारी ( दिनांक १६ सप्टेंबर) सायंकाळी तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. सुरुवातीला बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी यांनी व्यासपीठावर ज्ञानेश्वरी ग्रंथाला माल्ल्याअर्पण केले. 
"सुर निरागस हो.. शुभनयना" गणरायाला वंदन करत सुरसूमने उधळून सौ.सन्मिता शिंदे कार्यक्रमाला सुरुवात केली. निरूपणामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान ,मुक्ताई या चारही मुलांच्या जन्माचा उल्लेख करत जेवढे महत्त्व ज्ञानोबांना आहे तेवढेच इतर तीन भावंडांना देखील असल्याचे गणेश शिंदे यांनी सांगितले. माऊलींच्या आयुष्यामध्ये मुक्ताईच महत्त्व अधोरेखित केलं. समाज जग पेटवायला आलं तरी संतांनी पाणी म्हणून पुढे यावं म्हणत ज्ञानोबा यांना मुक्ताईने आधार दिला. चांगदेव महाराज एव्हढ वर्ष जगले पण त्यांना जगण्याची दिशा मुक्ताईने दाखवली. चांगदेवांनी जेव्हा ज्ञानोबांना कोरे पत्र पाठवले. तेव्हा ते पत्र मुक्ताईच्या हातामध्ये पडले. त्यावर "कोरे ते कोरेच" राहिले असे म्हणत चांगदेवांसाठी ज्ञानोबांना पत्र लिहिण्यास विनंती केली. ते पत्र म्हणजेच चांगदेव पासष्टी. चांगदेवांना ते समजून सांगण्याचे कामही मुक्ताईंनी केले. त्यामुळे एका अर्थाने चांगदेवांच्या गुरुदेखील मुक्ताई ठरल्या.
नामदेव महाराजांना देखील आपण गुरू करावा हा सल्ला मुक्ताईनेच दिला.मुक्ताई मुळे नामदेव यांना भक्तीचा, ज्ञानाचा मार्ग सापडला. ज्ञानोबाना मुक्ताई ने मांडे भाजायला खापर मागितल. तर ज्ञानोबांना गावात खापर सुद्धा कोणी दिले नाही. समाजाने संन्याशाची मुलं म्हणून वाळीत टाकले. तेव्हा योगीयांचा योगी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पाठीवर मांडे भाजायला मुक्ताईला सांगितले. बहिण भावाचं हे प्रेमाचं , भावनिक नातं गणेश शिंदे यांनी उलगडून सांगितलं. आज बहिण भावामध्ये अंतर पडत आहे. एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे दुरावतात. मोठ्या लोकांनी मोठ्या मनाने लहानांना मोठा वाटा द्यावा. वेगळ्या झालेल्या वाटा भेटून ,बोलून दुरावा संपवावा असे आवाहन केले. आई-वडील देखील जपा , ते देवघरातील निरंजन दिवा असून तो तेवत ठेवा. त्यांच्या जगण्याचा उत्सव करा. म्हातारपणी आई-वडिलांचेही आई -वडील व्हा. नात्यांमधला ओलावा जपा असेही ते यावेळी म्हणाले. पुढे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, निवृत्तीनाथांना गहिनीनाथ महाराजांची भेट या प्रसंगांना शब्द सेवेतून मांडले.
जेव्हा श्रोत्यांचे डोळे पाण्याने डबडबले..!
आपल्या मुलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी विठ्ठलपंत पैठणच्या धर्मपिठाकडे गेले. तेव्हा देहांत प्रायच्षिताची शिक्षा त्यांना देण्यात आली. आळंदीला घरी परतलेल्या विठ्ठलपंतांनी पत्नी रुक्मिणीला ही बाब सांगितली. दोघांनीही त्या शिक्षेचा स्वीकार केला. याचा उल्लेख आपल्या निरूपणामध्ये करत असताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या आई- वडील म्हणून असलेल्या भावना गणेश शिंदे यांनी उलघडून दाखवल्या. मुलं झोपेत असतानाच ते घरातून निघाले होते. त्यामुळे उद्या सकाळी आई- बाप मुलांना दिसायचे नाहीत. लेकरांना उघड्यावर टाकून जाताना निवृत्ती, ज्ञानदेव ,सोपान ,मुक्ताई या चौघांना त्यांनी शेवटचं बघितलं. घरातल्या पोथीत विठ्ठलपंत यांनी एक चार ओळीच पत्र लिहून ठेवलं आणि अनवाणी पायांनी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी घराबाहेर निघाले. त्याक्षणी असलेली त्या मायमाऊलीची मनोवस्था शब्द रूपाने प्रकट केली तेव्हा सभागृहातील महिला -पुरुष श्रोते गण यांच्या डोळ्यांना धारा लागल्या...
अन् जगाची माऊली समाधिस्थ झाली...
   आई-वडिल निघून गेल्यानंतर चारही भावंड पैठणच्या धर्मपीठाकडे शुद्धिपत्र मागायला गेली. तेव्हा शास्त्र पुरावा नसल्याने सांगत ते नाकारण्यात आलं. त्यावेळी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतल्यानंतर त्याच पैठणच्या धर्मपिठाने माऊलींच्या नावाचा जयघोष केला. तेथून माऊली नेवासी इथे आली. ज्ञानेश्वरी लिहिली. आळंदीला परतल्यावर घराशेजाराच्या म्हाताऱ्या आजीने या चारही भावंडांना आलिंगन दिले. माऊलींनी आपल्या घराजवळ मोगऱ्याचे रोप लावलं. आणि पंढरपूरला निघाले. तेव्हा आजीला या मोगऱ्याची काळजी घेण्याचे सांगितलं. संतांच्या माहेरी पंढरपुरात" निवृत्ती, सोपान, ज्ञानदेव ,मुक्ताई ...जय जय विठोबा रखुमाईचा" ..घोष निनादला. अवघा रंग एक व्हावा , थेट पांडुरंगाच्या आत्म्याशी एकरूपता यावी अशी माऊलींची अवस्था झाली आणि त्यांनी समाधीचा निर्णय घेतला. आळंदीला नामदेव महाराजांच्या मुलांनी समाधीची जागा स्वच्छ केली. समाधीची वेळ जवळ येत असताना घराशेजारची ती आजी हातामध्ये ज्ञानोबांनी लावलेल्या मोगऱ्याची फुले घेऊन आली. जगासाठी पसायदान मागणारी माऊली समाधीस्थ झाली. "इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी.. मोगरा फुलला, मोगरा फुलला."
रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली !
गणेश शिंदे मोगरा फुललाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीचा भावार्थ समजावून सांगत असताना सौ.सन्मिता शिंदे यांच्या गायनाने श्रवण सुखाचा लाभ उपस्थितांना लाभला. प्रसंगानुरुप त्यांनी गायलेले रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला..अनादी निर्गुण प्रकटली भवानी, आई चां जोगवा मागेन.... कानडा राजा पंढरीचा... वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे.... कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी.. अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर.. सादर करताना श्रोत्यांचे हातही टाळ्यांच्या कडकडाट करून गेले. सूत्रसंचालन व आभार संजय कुलकर्णी यांनी मानले. यावेळी अनंताभाऊ देशपांडे,संस्थेचे सरव्यवस्थापक श्री कैलाशजी कासट , बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महेश चेकेटकर व सचिव प्रशांत काळवाघे व कार्यकारणी सदस्य तसेच मुख्यालयातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.