जनतेच्या तक्रारींचा ऑन द स्पॉट निपटारा; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत १८ जुलैला सिंदखेडराजात होणार जनता दरबार!
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विविध शासकीय विभागांबाबत मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पावनभूमी सिंदखेडराजा येथून होत असून, पहिला जनता दरबार 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सिंदखेडराजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात होणार आहे.
या जनता दरबारात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महसूल, कृषी, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आरोग्य, वीज, पाणीपुरवठा तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींची सुनावणी करण्यात येणार असून, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्य तितक्या तक्रारींचा ऑन द स्पॉट निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.जनता दरबारात तक्रारींचा समावेश होण्यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारी 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे. यासाठी सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तहसील कार्यालयात विशेष जनता दरबार तक्रार कक्ष सुरू करण्यात आले आहेत. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा 18 जुलैच्या जनता दरबारात समावेश केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सिंदखेडराजा तहसील कार्यालयात श्रीमती ज्योती बारवाल (मो. 7276093269) व मनोज देशमुख (मो. 9823197001), तर देऊळगाव राजा तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी दीपक मोरे (मो. 9850814038) व बालाजी कौशल्य (मो. 9764619420) यांच्याकडे तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत.नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या तक्रारी वेळेत संबंधित तहसील कार्यालयातील विशेष तक्रार कक्षात जमा करून जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.