हरणीत जुन्या वादातून दगडाने ठेचून एकाची हत्या; आरोपीला अटक, आरोपीने आधीही दिली होती जीवे मारण्याची धमकी!
Aug 29, 2025, 11:00 IST
मंगरुळ नवघरे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :जुन्या वादातून तरुणाने दगडाने ठेचून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री हरणी गावात घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. गजानन बारकू पवार (वय ५५) असे मृतकाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश पवार (रा. हरणी) यांनी अमडापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे भाऊ गजानन बारकू पवार (वय ५५) हे बुधवारी रात्री शौचास जात असल्याचे सांगून घरातून गेले. बराच वेळ उलटूनही ते परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबीय आणि गावकरी शोध घेत असताना गावाबाहेर त्यांचा मृतदेह आढळला.
प्रथमदर्शनी पाहता मोठ्या दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान काशीराम शिवराम कुसळकर (रा. हरणी) या तरुणाने जुन्या वादातून गजानन पवार यांचा खून केल्याचे समोर आले. फिर्यादीत नमूद आहे की, आरोपी यापूर्वीही गजानन पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होता.
तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.