केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकरात आज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा भव्य संवाद मेळावा!

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; विविध योजनांच्या लाभांसह मदतीचे होणार वाटप!

 
 मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकरच्या शारंगधर नगरीत आज, २७ नोव्हेंबर रोजी दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत. दुपारी १ वाजता मेहकर येथील डी. पी. रोडवरील रिअलन्स लॉन्स येथे हा मेळावा पार पडणार आहे. जिल्हाभरातून हजारो शेतकरी या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता असून, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मेहकर

‘अनाथांचा नाथ... मदतीचा हात...’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकांना मदतीचा हात दिला जाणार आहे. शेतकरी कुटुंबातील विधवा, परित्यक्ता व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप, शेतकरी कुटुंबांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वाटप, लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट म्हणून दिवाळी आनंदाच्या शिधा किटचे वाटप करण्यात येणार आहे. शेतकरी कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण, नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप, दिव्यांग बांधवांना सहायक साहित्याचे वाटप, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी महिलांना मंजुरी आदेशांचे वाटप तसेच युवासेनेच्या वतीने गुरांना चारा वाटपाचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.

याशिवाय बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या धनादेशांचे वाटप, विविध विकासकामांचे ऑनलाइन लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासह जळगाव जामोदच्या शैक्षणिक संकुलाचे शुभारंभ कार्यक्रमही नियोजित असल्याचे आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचा समावेश या मेळाव्यात करण्यात आला आहे. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव या मेळाव्यातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना काय संदेश देणार, याकडे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.