...तर ३ एप्रिलला हिंगणे गव्हाड गावचे ग्रामस्थ करणार सामूहिक आत्मदहन...! जिल्हाधिकाऱ्यांना इशाराच देऊन टाकला

 
 नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा तालुक्यातील हिंगणे गव्हाड हे गाव जिगाव प्रकल्प क्षेत्राच्या बुडीत क्षेत्रात येते. पाटबंधारे विभाग शेगाव व भूमी अभिलेख बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने या गावातील घरांची संयुक्त मोजणी करण्यात आली. गावात संपूर्ण ४२७ घरे आठ अ ची आहेत. मात्र प्रत्यक्षात ३१९ घरे गावठाणात दाखवण्यात आली तर १०८ घरी ही गावठाणात दाखवण्यात आली नाही. त्यामुळे १०८ घर मालकांना घराचा मोबदला मिळताना मोठी तफावत राहणार आहे..त्यामुळे लवकर योग्य तो निर्णय घ्या, नाहीतर त्या १०८ घरांचे घरमालक सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे..
 ३ एप्रिलला जिगाव प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्या १०८ घर मालकांकडे गावठाणात असल्याचा योग्य तो पुरावा आहे, मात्र असे असताना त्यांना गावाच्या बाहेर दाखवण्यात आले आहे. याच विषयासंदर्भात गावातील आकाश उंबरकर व महादेव गव्हाड या युवकांनी नांदुरात तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण केले होते. त्यावेळी आमदार चैनसुख संचेती व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणाला भेट देऊन योग्य तो निर्णय घेऊन गावातील नागरिकांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन देऊन उपोषण सोडले होते. मात्र अद्याप कोणत्याही स्वरूपात ग्रामस्थांना तसेच लेखी पत्र मिळाले नाही, त्यामुळे आम्हाला मरण शिवाय पर्याय नाही असे म्हणत आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे..