अरेच्चा! थेट कमिशनखोरीची कबुली? आमदार संजय गायकवाड हे काय बोलून गेले; म्हणे,माझे ३५ कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांना सोडून दिले..आता शब्द फिरवला...
चिखली मतदारसंघातील विविध गावांमधील सुमारे ६०० कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार गायकवाड यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी बोलताना गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या उद्देशाने अनेक विधानं केली; मात्र त्यांच्या “कमिशन” संदर्भातील वक्तव्याने विशेष खळबळ उडाली आहे.
“माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्यूनर कारमध्ये फिरतात. जवळपास ३५ कोटी रुपयांचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना दिलं,” असे गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, “कार्यकर्ते मजबूत झाले तरच आम्ही मजबूत होतो,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी चिखली मतदारसंघाच्या राजकीय इतिहासावर भाष्य करताना, “पूर्वी हा मतदारसंघ मजबूत होता; मात्र हळूहळू कार्यकर्ते इतर पक्षांकडे वळले,” असेही सांगितले. स्वतःला “महाराष्ट्रातील ताकदवर आमदार” म्हणत, “मी कुणालाही घाबरत नाही आणि आमची ताकद सामान्य जनतेच्या पाठिंब्यासाठी वापरतो,” असा दावा त्यांनी केला. दरम्यान, गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, राजकारणातील कथित कमिशन प्रथेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
आता शब्द फिरवला...
दरम्यान गायकवाड यांच्या या वक्तव्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र आमदार गायकवाड यांनी शब्द फिरवला आहे. माझ्याकडून चुकीने कमिशन हा शब्द निघाला, मला काम म्हणायचे होते असे स्पष्टीकरण आमदार गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिले...