अधिकारी चर्चेला, कृषीमंत्री ना.मुंडेंचाही आला फोन...; तुपकर म्हणाले, तोंडी आश्वासनाला कंटाळलो! रिझल्ट द्या...मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही : तुपकरांनी केला पण...
Sep 6, 2024, 19:20 IST
सिंदखेडराजा, (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तपासणी करुन अन्नत्याग मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान सायंकाळी उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी व प्रशासनातील इतर अधिकारी देखील चर्चेसाठी आंदोलनस्थळी दाखल झाले होते. या चर्चेदरम्यान त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली तर ही चर्चा सुरु असतांनाच राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंढे यांचाही फोन आला. त्यांनीही तुपकरांशी फोनवरुन चर्चा केली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आम्हाला तोंडी आश्वासन नको, मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय झाल्याशिवाय अन्नत्याग सोडणार नाही, असे सांगत रविकांत तुपकरांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.
मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे सोयाबिन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड व इतर महत्वपूर्ण मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. तुपकरांच प्रकृती जसजशी खालावत आहे तसतसे आंदोलन अधिक तीव्र होत आहे. शेतकरी, कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करु लागले आहेत, त्यामुळे आता हे आंदोलन राज्यभर पेट घेऊन शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे प्रशासनातील अधिकारी दररोज चर्चेसाठी येत आहे. आज ६ सप्टेंबर रोजी तिसऱ्या दिवशीही उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, जिल्हा कृषि अधीक्षक श्रीधर ढगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार ब्रम्हदेव शेळके, तालुका कृषि अधिकारी, न.पा.मुख्याधिकारी आंदोलनस्थळी चर्चेसाठी दाखल झाले होते. विविध मागण्यांवर त्यांनी रविकांत तुपकरांशी चर्चा केली आणि तोंडी आश्वासन दिले परंतु आमच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, असे रविकांत तुपकरांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंढे यांनीही फोनवरुन रविकांत तुपकरांशी चर्चा केली. बैठक लावू असे आश्वासन कृषी मंत्र्यांनी तुपकरांना दिले, परंतू आम्हाला तोंडी आश्वासन नको ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार असे तुपकरांनी ठामपणे सांगितले. प्रशासनाला हे आंदोलन बळाचा वापर करुन मोडून काढयचे असेल तर त्यांनी तसे करावे आता आम्ही गोळ्याखाऊन मरायला तयार आहे, आमचा बळी घ्यायचा असेल तर खुशाल घ्या. परंतु शेतकऱ्यांचा संयम सुटला तर मी जबाबदार नाही, असे सांगत रविकांत तुपकरांनी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले.