अधिकारी गेंड्याच्या कातडीचे... खडकपुर्णातून पाणी मिळण्यासाठी शेळगाव आटोळच्या शेतकऱ्यांचे उपोषण; तिसरा दिवस मावळतीला, प्रकृती ढासाळली!

 

 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी मिळावे यासाठी शेळगाव आटोळच्या शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे, मात्र तरीही गेंड्याच्या कातडीचे प्रशासन हलायला तयार नाही. त्यामुळे प्रशासनाने लाजा सोडल्या की काय असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत..दरम्यान एका उपोषणकर्त्या शेतकऱ्याची प्रकृती ढासळली आहे.. मात्र निर्दयी यंत्रणेला पाझर फुटलेला नाही..त्यामुळे आता जीव गेला तरी चालेल मात्र माघार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे..

खडकपूर्णा प्रकल्पापासून अतिशय जवळ असलेल्या शेळगाव आटोळ, डोढ्रा, मिसाळवाडी या गावाला पाणी मिळत नाही. याउलट ५० किमी दूरवरच्या गावांना सिंचनासाठी पाणी मिळते. पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसत असून त्यामुळे शेकडो हेक्टर शेती ओलीतापासून वंचित राहत आहे.. अनेकदा शेतकऱ्यांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला मात्र निर्दयी सरकारला जाग आली नाही. अधिकारी देखील मस्तवाल आणि गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत, त्यांच्याकडून देखील यासंबंधीची हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे यंत्रणेला वैतागून आता शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. अंचरवाडी शेळगाव आटोळ रस्त्यावर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली खरी मात्र कोणताही ठोस शब्द यंत्रणेने दिला नाही. जीव गेला तरी आता माघार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान आज सायंकाळी एका उपोषणकर्त्या शेतकऱ्याची प्रकृती प्रचंड खालावली आहे, मात्र अद्याप वैद्यकीय यंत्रणा तपासणीसाठी पोहोचलेली नाही...