आता बारदाना नसल्याचे कारण देत शासकीय खरेदी बंद; शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडत आहे : जालिंदर बुधवत...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा सरकारचा प्रयत्न चालला आहे. बारदाना नसल्याचे कारण सांगण्यात येत असून हमीभावाने खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. आधी उद्दिष्ट संपल्याचे सांगून ही खरेदी बंद करण्यात आली होती. तर आता बारदाना नसल्याचे सांगण्यात येत आहे. हा एकप्रकारे व्यापाऱ्यांचे हित जपण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडील बारदानामध्ये शेतमाल खरेदी करावा अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचे नेतृत्वात करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत यासंदर्भात मागणीची निवेदन देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल पडून असताना बारदाण्याचे कारण सांगून शासकीय हमीभाव केंद्र सध्या बंद आहेत. गत  दीड - दोन  महिना भरापूर्वी  शेतकऱ्यांच्या घरातला शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत हमीभाव केंद्र सुरू ठेवण्याची मागणी आंदोलनाद्वारे शिवसेनेने केली होती. त्यानंतर शासनाने रडत पडत का होईना पण हमीभाव केंद्र पूर्ववत सुरू देखील केले. मात्र आत्ता बारदाना नसल्याचे कारण सांगून पुन्हा खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात जवळपास ४० खरेदी केंद्र  सुमारे महिनाभरापासून बंद  असल्याची माहिती ही  मिळालेली आहे. शेतकरी हिताचा विचार न करता यातही व्यापारी हित जपण्याचा हा एकप्रकार असून याबाबत तीव्र निषेध शिवसेनेच्या वतीने व्यक्त  करण्यात आला आहे.  शेतकऱ्यांना बारदाना नसल्याचे कारण सांगत त्यामुळे  खरेदी केंद्र बंद ठेवून शेती उत्पादन कमी भावाने व्यापाऱ्यांना विकण्यासाठी प्रवृत्त करणे आणि त्यानंतर मग तोच व्यापाऱ्यांकडील शेतमाल संगणमताने विविध शेतकऱ्यांच्या नावाने  नाफेडला विकणे आणि त्यातून व्यापाऱ्यांनी पैसा कमावणे अशा प्रकारचे एक रॅकेट यात सक्रिय असल्याचे उघडपणे सांगण्यात येते. याबाबत देखील राज्य सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत. यावर नियंत्रण असलेल्या संबंधित खाते प्रमुख आणि मंत्री यांचे तर यात संगणमत नाही ना ?असा देखील प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करतात.  

पुढीलहंगामाला सामोरे जाताना शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक आवक असणे गरजेचे आहे. अजून देखील शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन, हरभरा, मका , तर पडून आहे. हा प्रकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यासारखा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडील बारदाण्यांमधून शेतमाल खरेदी करावा अशी  मागणी आहे. अन्यथा  आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत,  प्रवक्त्या सौ जयश्रीताई शेळके, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे,  मोताळा तालुकाप्रमुख विजय इंगळे, रवी राजपूत, गोविंद डांगर, मोहित राजपूत, अनिल राणा, गजानन धांडे, सुधाकर मुंढे, मिलिंद गवई, सुरेखाताई तायडे, रत्नाताई शेळके, सुनंदाताई खरात, स्मिता वराडे,अनिता जाधव, ऋणाली उबरहांडे, सपना इंगळे, शीतल सुरडकर, पल्लवी शेळके, बेबी परिहार, सुवर्णा जाधव, सुनीता दराखे, भारती डागोर, श्रीकांत जाधव, निर्मल इंगळे, अमित जाधव, भीमराव गवळी, सुभाष गवळी तसेच शिवसैनिक,महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन : जयश्री शेळके

शेतकऱ्यांच्या घरात उत्पादन पडून असताना केवळ बारादाणा नाही अस सांगून खरेदी बंद ठेवल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा गंभीर इशारा शिवसेना राज्य प्रवक्ता सौ.जयश्रीताई शेळके यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना दिला.