आमदार गायकवाड यांच्या "त्या" वक्तव्यावर आता थेट मुख्यमंत्रीच बोलले! म्हणाले, शिवराळ भाषा....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाच्या प्रकाशकाला त्यांनी आई बहिणी वरून शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली..त्यासंबंधित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात निषेधाचे सूर उमटत आहेत.. शिंदे यांच्या शिवसेनेने देखील आमदार गायकवाड यांची बाजू घेतल्याचे दिसले नाही.दरम्यान आता आ. गायकवाड यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.. शिवराळ भाषेचे समर्थन करता येणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चितच त्यांना योग्य ती समज देतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यास यांना आमदार गायकवाड यांच्या त्या विधानाबाबत माध्यमांनी छेडले. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संबंधित पुस्तक प्रकाशित होऊन जवळपास ४० वर्षे होत आहेत.
आता त्यावर अशा पद्धतीने व्यक्त होणे कितपत योग्य आहे यावर विचार व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या शिवराळ भाषेचे कुणीही समर्थन करू शकत नाही, निश्चितच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना योग्य ती समज देतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.