अबब..! १५.५ किलोचा 'मांसाचा गोळा', हिप जॉइंटचे गंभीर फ्रॅक्चर अन् मृत्यूशी झुंज...
बुलढाण्यात डॉक्टरांनी अशक्य वाटणारी शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेला दिले जीवदान! राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उपलबधी...
रुग्ण अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त होती. हिप जॉइंटच्या फ्रॅक्चरमुळे ती पूर्णपणे अंथरुणाला खिळली होती. त्यातच पोटात वाढलेल्या प्रचंड गाठींमुळे आतड्यांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यामुळे पचनक्रिया बिघडली होती आणि दैनंदिन हालचालींवर गंभीर परिणाम झाला होता. दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्याने महिलेला कमालीचा अशक्तपणा आला होता. अशा परिस्थितीत भूल देऊन शस्त्रक्रिया करणे हेच डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होते.
रुग्णाची प्रकृती, फ्रॅक्चर आणि पोटातील प्रचंड गाठी यांचा सर्वंकष अभ्यास करून डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत बारकाईने नियोजन केले. अखेर सुमारे दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे तब्बल १५.५ किलो वजनाचा मांसाचा गोळा, अंडाशयातील मोठी गाठ, गर्भाशय तसेच पोटातील अतिरिक्त चरबीचा थर यशस्वीरित्या काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिला अतिदक्षता विभागात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.ही शस्त्रक्रिया केवळ तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची नव्हती, तर रुग्णाची अत्यंत नाजूक प्रकृती लक्षात घेता जीवाला धोका निर्माण होण्याचीही शक्यता होती. मात्र डॉक्टरांच्या अनुभव, अचूक नियोजन आणि समन्वयामुळे ही अत्यंत धोकादायक शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. त्यामुळे राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेत शल्यचिकित्सक डॉ. निखिल नलावडे, डॉ. गौरव गायकवाड, डॉ. किशोर वानखेडे, डॉ. शुभम पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर भूलतज्ज्ञ डॉ. सुवर्णा काटकर यांनी अत्यंत नाजूक परिस्थितीत सुरक्षित भूल व्यवस्थापन करून शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी मोलाची जबाबदारी पार पाडली.