जन्मदिन नव्हे तर शेतकरी व जवानांप्रति कृतज्ञता दिन! बुलढाण्यातील निवासस्थानी तुपकर कुटुंबीयांचे उपोषण; तुपकर म्हणाले...

 

 

बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :स्वाभिमानी शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांचा आज १३ मे रोजी जन्मदिवस आहे. आपला जन्मदिन साजरा न करता, शेतकरी व जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे. बुलढाणा येथील चिखली रोड मार्गावरील निवासस्थाना समोर हे उपोषण सुरू आहे.
सकाळपासूनच रविकांत तुपकर यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतकरी तुपकर यांच्या निवासस्थानी जमले आहेत. शहीद भगतसिंग व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी, शेतकऱ्यांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले, आज दिवसाला दहा शेतकरी राज्यात आत्महत्या करत आहेत. सोयाबीन कापसाला भाव व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय प्रलंबित आहे, यावर राज्य सरकार लक्ष देत नसल्याने नेहमीप्रमाणे आपण शासन दरबारी शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार आहोत.
शेतकरी संकटात असताना जन्मदिवस साजरा करणे हे उचित वाटले नाही, या कारणाने एक दिवसीय उपोषणाचे आयोजन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.