निवडणूक आयाेगावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे! १ जुलैला मतदार यादी गोठवणार असल्याची पूर्वसूचना का दिली नाही?

 आ. संजय गायकवाड यांचा सवाल! बुलढाण्यात चार हजार बाेगस मतदारांची नावे असल्याचा केला दावा 

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मतदार यादीतील घाेळावर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेले असतानाच बुलढाणा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही निवडणुक आयाेगावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू असल्याचा आराेप करीत एकट्या बुलढाण्यात चार हजार बाेगस मतदारांची नावे असल्याचा दावा केला आहे. 
 
पत्रकारांशी बाेलताना गायकवाड यांनी सांगितले की, प्रारुप यादीपर्यंत एखादा तरूण १८ वर्षांचा हाेत असेल आणि तुम्ही १ जुलै राेजीच मतदार यादीत नावे टाकणे बंद करत असाल तर तुम्ही हजाराे नवमदारांना मतदानापासून वंचित ठेवत आहात. जुलै ते ऑक्टाेबर या दरम्यान १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना नाव नाेंदवण्याची सुविधाच नाही. १ जुलै रोजी मतदार यादी गोठवणार असल्याची कुठलीही पूर्वसूचना का दिली नाही? असा सवाल देखील आ.गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
 दुसरीकडे बुलढाण्यात चार हजारांपेक्षा जास्त नावे बाेगस आहेत. ही नावे पुन्हा पुन्हा आली आहेत. हे मतदार जिल्हा परिषद, पंचायत समितीला ग्रामीण भागात मतदान करतात आणि नगर पालिकेला शहरात मतदान करतात असा दावाही आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. रिपीट झालेली नावे आयाेग का काढत नाही, असा सवाल करून त्यांनी बुलढाण्यात ३० वर्षांपूर्वी सरकारी नाेकरीत असलेल्या अधिकाऱ्यांची नावे मतदार यादीत आहेत.
एवढेच नव्हे तर २० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मतदारांची नावेही यादीत आहेत. यांच्या नावावर कुणीही येवून बाेगस मतदान करीत असल्याचा खळबळजनक दावाही गायकवाड यांनी केला. निवडणुक आयाेग नावे टाकूही देत नाही आणि कमीही करू देत नाही. मतदार कार्ड आधार कार्डशी जाेडा, मृत्यूचे दाखले आल्यानंतर नावे कमी करावे. पण हे निवडणूक आयाेग का करीत नाही.
१ जुलै ते ऑक्टाेबर महिन्यात नविन मतदारांना संधी दिली असती तर अनेक नवमतदारांना मतदानाची संधी मिळाली असती. मात्र, निवडणुक आयाेगाने कुठलीही पूर्वसूचना न देता थेट मतदार यादीत नावे नाेंदवणे बंद केले. त्यामुळे, हजाराे मतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. बाेगस मतदार काढा, अशी मागणी सर्वच पक्ष करीत आहेत, मी एकटाच नाही असेही गायकवाड यांनी सांगितले. आता संजय गायकवाड यांनीही निवडणुक आयाेगावर टीका केल्याने याचे पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे.