आठवडाभरापासून अंघोळ नाही! केसगळतीमुळे नागरिक हैराण....
जिल्हा प्रशासक व आरोग्य विभागाने या रोगाची तातडीने निदान करून भय दूर करावे अशी मागणी होत आहे. बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगांव, मच्छिंद्र खेड, हिंगणा, माटरगाव या गावातील लोक केस गळतीच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ,अमोल गीते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भागवत भुसारी, यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी बाधित गावांमध्ये पोहोचले आहेत.. केस गळती होणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे, वैद्यकीय महाविद्यालयांचे शास्त्रज्ञ आजाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. रुग्णांची तपासणी करून त्वचा व रक्ताचे नमुने घेतले जात असून ते तपासणी करता लॅबला पाठवण्यात आले आहेत. दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असे आवाहन शासनाने केल्यानंतर मागील आठवडाभरापासून बाधित गावांमधील अनेक नागरिकांनी अंघोळच केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे...
अंघोळीसाठी पाणी वापरू नका..
शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावे खारपाण पट्ट्यात येतात. त्यामुळे या भागातील नागरिक वापरत असलेले पाणी वारंवार यंत्रणेकडून तपासणे आवश्यक आहे. त्यातच आता आरोग्य यंत्रणेने बाधीत गावांतील बोअरवेल आणि विहिरींचे पाणी अंघोळीस व वापरास अयोग्य असल्याचे जाहीर करत पाणी न वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून हेच पाणी वापरले जात होते तेव्हा मात्र शासनाने का तपासणी केली नाही ? असा सवाल आता उपस्थित केल्या जात आहे...