जिल्ह्याचा गौरव वाढवणारी बातमी! जिल्ह्याच्या भूमिपुत्राला मिळणार लंडनमध्ये कीर्तनाचा मान! ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील करणार लंडनमधील भक्तांना मंत्रमुग्ध;

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही केले कौतुक...
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय... ही बातमी संपूर्ण जिल्हाभरासाठी अभिमानास्पद आहे गौरवास्पद आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील इसरूळ येथील एका सामान्य शेतकरी कष्टकरी कुटुंबातून आलेल्या ह. भ. प पुरुषोत्तम महाराज पाटील (भुतेकर) यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आता पुरुषोत्तम महाराज पाटील यांना लंडन येथे कीर्तनाचा मान मिळाला आहे. पुढील आठवड्यात पुरुषोत्तम महाराज लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या उपलब्धीबद्दल पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

लंडन येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांनने पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे. लंडनच्या भूमीत कीर्तनाचा मान मिळालेले पुरुषोत्तम महाराज पाटील हे जिल्ह्यातील एकमेव कीर्तनकार ठरले आहेत. अतिशय गोड गळ्याची देण लाभलेले ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. सोशल मीडियावर त्यांचे कीर्तन आणि अभंग चांगलेच व्हायरल होतात. इसरूळ येथे महाराष्ट्रातील पहिले संत चोखोबारायांचे मंदिर पुरुषोत्तम महाराज यांनी उभारले आहे.
महाराष्ट्रातील विविध मंदिरांच्या जीर्णोध्दारात तसेच गोरक्षणात देखील पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा हिरारीचा सहभाग राहिला आहे. आता पुरुषोत्तम महाराज पाटील यांना लंडनमध्ये कीर्तनाचा मान मिळाल्यामुळे बुलडाणेकरांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक...
पुरुषोत्तम महाराज पाटील यांना लंडनमध्ये कीर्तनाचा मान मिळाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कौतुक केले आहे. समस्त वारकरी संप्रदायासाठी हा गौरवाचा क्षण आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर लंडन आणि जिव्हाळा परिवाराच्या वतीने एक अद्वितीय असा सोहळा आयोजित केल्याचा आनंद आहे. ह. भ. प पुरुषोत्तम महाराज पाटील आपल्या रसाळ वाणीतून भक्ती, नामस्मरण आणि संतपरंपरेचे अमृत सिंचन करणार आहेत. पांडुरंगाच्या नामाचा जयघोष थेट लंडनच्या आकाशात दुमदुमणार आहे, प्रत्येक मराठी माणसासाठी हा क्षण अभिमानाचा आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत...