जिल्हाभर खळबळ उडवणारी बातमी! भालगावच्या १० शेतकऱ्यांनी दिला सामूहिक आत्महत्येचा इशारा; म्हणाले,साहेब जगून काय फायदा? तहसीलच्या कुचकामी यंत्रणेमुळे पेरणी रखडली;
शेती पडली पडीत..जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा विधानभवनासमोर देणार जीव..काय आहे संपूर्ण प्रकरण...
Updated: Jul 5, 2025, 16:26 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "पेरणी उलटून गेली..मात्र अजून आमची शेती पडीत आहे साहेब..लोकांच्या वावरात सोयाबीन,कपाशी ही पिके डोलू लागलीत..आमच्या वावरात मात्र गाजर गवताशिवाय दुसरं काय नाही..आमचा उदरनिर्वाह शेतीवरच हाय..दुसरं उत्पन्नाच साधन नाही.आमच्या वावरात जायले जो रस्ता व्हता,तो त्या लोकांनी बंद केला.. तहसीलदारांनी आमच्या बाजूने आदेश दिला..रस्ता खुला करायचे सांगितले..मात्र आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही..जे अधिकारी रस्ता खुला करायला आले,त्यांनी कागदावरच रस्ता खुला केला..आता तुम्हीच सांगा साहेब आम्ही काय कराव? काय खावं... लेकरा बाळांना कसं सांभाळावं? आता आमच्याकडे मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही...त्यामुळे आता काहीही हो..यंत्रणा जर आम्हाले रस्ता खुला करून देतं नसेल तर आम्ही मरणार...आम्ही बलिदान देणार... आम्हाले न्याय मिळत नसेल तर आमचा जगून काय फायदा?" हे शब्द आहेत चिखली तालुक्यातील भालगाव येथील शेतकऱ्यांचे... भालगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यात सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. ८ जुलैपर्यंत रस्ता खुला करून द्यावा नाहीतर ९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा चिखली तहसील कार्यालय किंवा विधानभवनासमोर सामुहिक आत्मदहन किंवा विष प्राशन करू असे निवेदनात म्हटले आहे. याव्यतिरिक्त शेतरस्त्याच्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या करू असाही इशारा निवेदनात दिला आहे...
शेतकऱ्यांचे निवेदन जसेच्या तसे..
आम्ही भालगाव येथील शेतकरी आपणास नम्रपणे निवेदन करतो ती, आमची भालगाव शिवारात सर्वे नंबर ६० मध्ये गट नंबर १७३,१७१, १७२,१७०,१७८ मध्ये सर्वांमिळून ४ हेक्टर १० आर एवढी शेती आहे. आज रोजी ही शेती पडीत आहे.. परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊनही आम्हाला शेतरस्त्याअभावी पेरणी करता आलेली नाही. आमची सर्व उपजीविका शेतीच्या भरवशावरच अवलंबून असल्याने आमच्याकडे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही. आमच्या शेताकडे जाण्यासाठी पूर्वापार वडिलोपार्जित वहिवाटी रस्ता होता.
मात्र यावेळी प्रतिवादींनी त्या रस्त्यावर दगडाची पाळ रचून रस्ता अडवला आहे. या संबंधाने आम्ही १२ मार्च २०२३ रोजी चिखली तहसीलदारांकडे अर्ज केला होता. त्यावर माननीय तहसीलदारांनी २० जून २०२५ रोजी रस्ता खुला करण्याचे आदेश पारित केले होते. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी १ जुलै २०२५ रोजी नायब तहसीलदार श्री. वीर भालगाव येथे आले होते. त्यांनी केवळ कागदोपत्री पंचनामा करून रस्ता कागदोपत्री खुला केला. त्यावर वादी प्रतिवादी दोन्ही पक्षांनी सह्या देखील केल्या. मात्र दुसऱ्या दिवशी आम्ही पेरणीसाठी गेलो असता प्रतिवादींनी पुन्हा आमची अडवणूक केली. यावेळी गावचे सरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील देखील घटनास्थळी हजर होते. मात्र प्रतिवादींनी कुणाचेही ऐकून घेतले नाही व शिवीगाळ करून हाकलून लावले. वास्तवात शेत रस्ता मिळवण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे, त्यासंबंधी शासनाचे तसे आदेश देखील आहेत,( संदर्भ–दिनांक– २२ मे २०२५ शासन निर्णय,क्रमांक जमीन–२०२५/प्र. क्र.४७/ज–१ अ) त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचा आणि कायद्याने रस्ता मागतो आहे. या देशात संविधानाने निर्माण केलेल्या कायद्यावर आमचा विश्वास आहे..
मात्र कायद्याची अंमलबजावणी जर यंत्रणेकडून होत नसेल तर आमच्याकडे मरण्याशिवाय आता कुठलाही पर्याय नाही. सध्या पेरणीचे दिवस उलटून गेले आहे, त्यामुळे आम्हाला तातडीने मंगळवार दिनांक ८ जुलै पर्यंत रस्ता प्रत्यक्ष खुला करून द्यावा. जेणेकरून उशिरा का होईना आम्हाला पेरणी करता येईल..अन्यथा आमचे जगणे मुश्कील आहे, आम्ही करावे तरी काय? संसाराचा गाडा कसा ओढावा? असे प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाले आहेत..त्यामुळे संबंधित यंत्रणेने जर रस्ता खुला करून दिला नाही तर आम्ही सर्व शेतकरी बुधवार दिनांक-९ जुलै २०२५ रोजी, ठीक १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा किंवा चिखली तहसील कार्यालय यांच्यासमोर विष प्राशन किंवा आत्मदहन करू.. किंवा शेत रस्ता परिसरात असलेल्या झाडांवर गळफास घेऊन आत्महत्या करणार आहोत..किंवा मुंबई येथील विधानभवनासमोर देखील आम्ही आत्महत्या करू......" असा निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. रमेश चत्तरसिंह परिहार, चंद्रपाल भिकाजी परिहार, विश्वनाथ गुलाबराव परिहार, गजानन एकनाथ परिहार, आंबादास तुळसिंग परिहार निवेदनावर या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत..