बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकरांचा राजीनामा...

 
  
चिखली (बुलडाणा लाइव्ह लाइव्ह वृत्तसेवा) :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असल्याने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आणि माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
माजी आमदार रेखाताई खेडेकर या पक्षफुटीनंतर शरद पवार यांच्या गटासोबत होत्या.त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत पक्षसंघटन पुन्हा उभारण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यांनी दिलेला हा राजीनामा पक्षासाठी राजकीय धक्का मानल्या जात आहे.
खेडेकर यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पत्राद्वारे सादर केला असून, त्यात त्यांनी “मी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने देत आहे. कृपया तत्काळ स्वीकारावा,” अशी विनंती केली आहे.
तथापि, त्यांनी राजीनाम्याचे सविस्तर कारण किंवा पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे “रेखाताई आता कुठे?” हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.