नरेंद्र मोदी चौथ्यांदा पंतप्रधान होतील! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विश्वास; बुलढाण्यात पत्रकारांशी साधला संवाद! .वक्फ बोर्डाबद्दल म्हणाले..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. नरेंद्र मोदी बाबासाहेबांना मानणारे नेते आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले, ५१ कोटी लोकांना जनधन योजनेचा फायदा मिळाला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ४ कोटी लोकांना घरे मिळाली. हे सरकार जात-पात धर्मपंथ विरहित काम करते.. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सर्वच धर्माच्या लोकांना मिळत आहे.. नरेंद्र मोदी हे जागतिक पातळीवरचे लोकप्रिय नेते आहेत, भारतातही ते प्रचंड लोकप्रिय असून ते चौथ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला. ना.आठवले आज बुलढाणा जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत, बुलढाणा येथील विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
    ना. रामदास आठवले यांचे दुपारी २ वाजता बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी त्यांनी रिपाई आठवले गटाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. समाजकल्याण व न्याय मंत्रालयाच्या विविध योजनांचा आढावाही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत घेतला. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.. रिपाई आठवले गटाला पुढच्या ५ वर्षांत राष्ट्रीय पक्ष बनवण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी ना.आठवले यांनी सांगितले.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार अतिशय चांगले काम करत आहे. सर्वसामान्य माणसांच्या हिताचा विचार करतच केंद्र सरकार निर्णय घेत असल्याचे ना.आठवले म्हणाले. केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ बोर्डाच्या संशोधन विधेयकाला आमच्या पक्षाचा पाठिंबा आहे.वक्फ संशोधन विधेयक मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा कांगावा विरोधक करत आहेत मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही असेही ना.आठवले म्हणाले.
संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांकडून करण्यात आला. त्याचे आम्हाला थोडेफार नुकसान सहन करावे लागले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांच्या विचारांवर काम करीत आहेत असेही ना. आठवले म्हणाले. 
भूमिहीनांना जमीन द्यावी..
देशात आजही अनेक लोक भूमीहीन आहेत. त्यांना जमीन मिळाली पाहिजे ही आमची जुनीच मागणी आहे. देशभरात २० कोटी एकर खाली आहे.. ती भूमिहीनांना देता येईल. विदर्भात शेकडो एकर जमीन झुडपी जंगलाची आहे ती जमीन भूमिनांना कसण्यासाठी द्यावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे ना.आठवले म्हणाले.