“नाना पाटेकर गेले नाहीत, शेतकऱ्यांच्या मनात कायम जिवंत राहतील!”; रविकांत तुपकर भावूक! दुष्काळात बळीराजाच्या मदतीला धावून जाणारे संवेदनशील मन हरपले;

 ‘नाम’च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलेल्या आधाराच्या आठवणींना उजाळा...

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने महाराष्ट्रासह शेतकरी समाजावरही शोककळा पसरली आहे. नानांच्या निधनाचे वृत्त समोर येताच शेतकरी नेते रविकांत तुपकर भावूक झाले. “नाना पाटेकर हे केवळ अभिनेते नव्हते, तर शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणारे संवेदनशील मनाचे माणूस होते. त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांचा आधारवड हरपला,” अशी भावना तुपकरांनी व्यक्त केली.दुष्काळाच्या काळात नाना पाटेकर आणि ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी व आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. जलसंधारणाची कामे, गरजू कुटुंबांना मदत आणि ग्रामीण भागातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून नानांनी शेतकऱ्यांच्या दुःखाशी आपले नाते जोडले होते.

“दुष्काळ पडला की केवळ चिंता व्यक्त न करता नाना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या दुःखात सहभागी झाले. त्यांनी शेतकऱ्यांची वेदना स्वतःची मानली. म्हणूनच आज एका महान अभिनेत्याचेच नव्हे, तर आपल्यातील संवेदनशील माणसाचे निधन झाल्याचे दुःख आहे,” असे तुपकर म्हणाले. “नानांचा आवाज पडद्यावर आता ऐकू येणार नाही; पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले काम आणि दिलेला आधार कायम स्मरणात राहील. नाना पाटेकर शेतकऱ्यांच्या मनात सदैव जिवंत राहतील,” अशा शब्दांत रविकांत तुपकरांनी नाना पाटेकरांना श्रद्धांजली अर्पण केली.