थकीत वीजबिलांवर महावितरणचा ‘स्ट्राईक’; वरवट बकाल केंद्रात मीटर जप्त, १.८१ कोटींची थकबाकी
Mar 4, 2026, 15:12 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वीजबिल न भरल्यामुळे वरवट बकाल (ता. संग्रामपूर) वितरण केंद्राअंतर्गत महावितरणने सामूहिक वसुली मोहीम राबवत थकबाकीदार ग्राहकांवर कठोर कारवाई केली आहे. केवळ वीजपुरवठा खंडितच नव्हे, तर काही ठिकाणी थेट वीज मीटर काढून जप्त करण्यात आले. “वीजबिल नसेल भरले, तर वीजही मिळणार नाही,” अशी भूमिका महावितरणला घ्यावी लागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या संग्रामपूर उपविभागातील वरवट बकाल वितरण केंद्राअंतर्गत घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा एकूण ३,८९९ ग्राहकांकडे तब्बल १ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने सामूहिक कारवाईचे निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले होते.
कारवाईदरम्यान ७३ ग्राहकांनी ६ लाख २१ हजार रुपयांचा भरणा करून पुढील कारवाई टाळली. मात्र १८ ग्राहकांचे वीज मीटर काढून जप्त करण्यात आले. त्यापैकी १३ ग्राहकांनी थकबाकी भरल्यानंतर त्यांच्या ठिकाणी नव्या स्मार्ट मीटरची बसवणूक करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी जिल्ह्यातील ग्राहकांना आवाहन करताना सांगितले की, थकबाकी वाढू न देता वेळेवर वीजबिल भरून सहकार्य करावे.
अनधिकृत जोडणी आढळल्यास गुन्हा दाखल
महावितरणने स्पष्ट केले आहे की, ज्या ग्राहकांचे मीटर काढण्यात आले आहेत त्यांनी शेजारील घरातून अनधिकृत वीजजोडणी घेतल्यास किंवा दिल्यास संबंधित दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात येईल. वीजचोरी रोखण्यासाठी आणि थकबाकी वसुलीसाठी अशी कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.