MPSC परीक्षा सतत पुढे ढकलली जात असल्याने तणावातून हार्टॲटॅक!

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असल्याने तणावाखाली आलेल्या 30 वर्षीय विद्यार्थ्याचा हार्टॲटॅक येऊन मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथे आज, 16 मार्चला समोर आली आहे. यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, हजारो एमपीएससीच्या उमेदवारांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. …
 

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असल्याने तणावाखाली आलेल्या 30 वर्षीय विद्यार्थ्याचा हार्टॲटॅक येऊन मृत्‍यू झाल्याची खळबळजनक घटना साखरखेर्डा (ता. सिंदखेड राजा) येथे आज, 16 मार्चला समोर आली आहे. यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, हजारो एमपीएससीच्या उमेदवारांत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. दुसरीकडे सर्वसामान्य परिस्थितील कुटुंबाची दैना दूर करण्यासाठी अधिकारी बनण्याचे या युवकाचे स्वप्न भंगले असून, त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गणेश केशव बेंडमाळी (रा. साखरखेर्डा) असे या युवकाचे नाव आहे. तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत होता. एक वर्षापासून या स्पर्धेची परीक्षा न झाल्याने तो तणावाखाली वावरत असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गणेश हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनण्याची  स्वप्ने रंगवत होता. अल्पभूधारक कुटुंबाचा सदस्य असल्याने  घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची, भरीस भर वडिलांचा दोन वर्षांपूर्वीच कँसरने मृत्यू झाला होता. त्यामुळे अधिकारी होऊन कुटुंबाचा आधार होण्याचा विचार गणेश करत होता. मात्र परीक्षा होत नसल्याने तो तणावाखाली वावरत होता. 21 मार्चला परीक्षा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहे. मात्र आजवर इतक्या वेळा तारिख पुढे ढकलली आहे की उमेदवारांचा विश्वासच उडालेला आहे. यातूनच गणेशही चिंतित होता. परीक्षा होईलच अशी शाश्वती नसल्याने  तो तणावाखाली वावरत होता. याच तणावातून 14 मार्च रोजी रात्री 11 वाजता अचानक त्‍याच्‍या छातीत दुखू लागल्याने त्याला तातडीने चिखली येथे उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र मध्येच त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे त्याच्या कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे, त्यामुळे MPSC परीक्षा वेळोवेळी पुढे ढकल्याने आयोग आणि राज्य सरकार गणेशच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा रोष नागरिकांकडून व्यक्त होत आहे.