खामगावातील ‘धोकादायक’ गुन्हेगारावर एमपीडीएचा बडगा; एक वर्षासाठी स्थानबद्ध, सणासुदीपूर्वी पोलिसांची कडक कारवाई! खामगाव शहरातील गुन्हेगार ताब्यात...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खामगाव शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका धोकादायक गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले तसेच धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठीच्या अधिनियम १९८१ (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करत त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सदर कारवाई रितीक रमेश इंगळे (वय २५), रा. कोठारी फैल, खामगाव या इसमाविरुद्ध करण्यात आली आहे. त्याच्यावर मालमत्ता, शरीराविरुद्ध तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने तो परिसरासाठी धोकादायक ठरत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते.
जिल्ह्यात लवकरच गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी तसेच इतर सणोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत.
या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, नागरिकांच्या जिवीतास व मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये आणि जिल्ह्यात शांतता राखली जावी, या उद्देशाने जिल्हा पोलीस प्रशासनाने धोकादायक गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना अशा गुन्हेगारांविरुद्ध प्रस्ताव तयार करून आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखांची छाननी करून धोकादायक इसमांविषयी माहिती गोळा करण्यात आली आणि संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे सादर करण्यात आला.
सदर प्रस्तावाची दखल घेत दि. १७ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत रितीक रमेश इंगळे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. या आदेशानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव), अमोल गायकवाड (बुलढाणा) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व खामगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
या पथकात पोलीस हवालदार संजय भुजबळ, पोलीस नाईक राकेश नायडू, पोलीस हवालदार अरुण हेलोडे तसेच पोलीस कर्मचारी राम धामोळे, विष्णु चव्हाण आणि अमर ठाकूर यांचा सहभाग होता. सणासुदीच्या काळात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी धोकादायक गुन्हेगारांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार, असा स्पष्ट संदेश पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.