रस्त्याने जाणाऱ्या आई-मुलीला कारने उडवले; आईचा दुर्दैवी मृत्यू, मुलगी गंभीर जखमी जलंब येथील एन.एम.जी. इंग्लिश स्कूलसमोर अपघात; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, जलंब, ता. शेगाव येथील रहिवासी सौ. अरुणा विष्णुदास संबारे (वय ४९) आणि त्यांची मुलगी कु. नेहा विष्णुदास संबारे या दोघी काही कामानिमित्त रस्त्याने पायी जात होत्या. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एमएच ५६ ए ४३१५ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.
फिर्यादीनुसार, कारचालक गजानन शिवराम गवई (रा. भेंडवळ, ता. जळगाव जामोद) याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून आई-मुलीला धडक दिली. या अपघातात अरुणा संबारे यांचा मृत्यू झाला, तर नेहा संबारे जखमी झाली.
या प्रकरणी विष्णुदास ज्ञानेश्वर संबारे यांनी जलंब पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी कारचालक गजानन गवई याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१ आणि १२५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या अपघाताचा पुढील तपास ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नन्हेखा तळवी करीत आहेत. दरम्यान, भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याने जलंब परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.