मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत दीड हजारावर पदे रिक्त; पदभरती कधी होणार ? शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचा सवाल! ग्रामीण भागाच्या विकासावर थेट परिणाम
Jul 22, 2025, 08:26 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ग्राम विकासाचा खऱ्या अर्थाने कणा मानल्या जाणाऱ्या आणि मिनी मंत्रालयाचा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दीड हजारावर रिक्त पदे हा गंभीर विषय आहे. रिक्त पदांचा अतिरिक्त बोजा हा कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांवर पडतो. शिवाय कामाची गती देखील मंदावते. याचा थेट परिणाम हा विकास कामांवर होत असून ही पदे कधी भरणार असा सवालच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी शासनाला विचारला आहे.
याबाबत रीतसर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. एकट्या बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये गट _ब ( अराजपत्रित गट ब ) गट क आणि गट ड अशा तीन संवर्गांमध्ये ९२९८ पद सरळ सेवेने मंजूर आहेत, तर पदोन्नतीने १३१० अशी एकूण १०६०८ पदे मंजूर आहेत. त्या तुलनेत ९०८२ पदे सध्या भरलेली आहेत. याचाच अर्थ (सरळ सेवा ११५३, पदोन्नतीचे ३७३ ) १५२६ पदे सध्या रिक्त आहेत. आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन ,कृषी विभाग, पाटबंधारे, बांधकाम, शिक्षण, वित्त विभाग , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा महिला व बालकल्याण विभाग यासह जवळपास सर्वच विभागांमध्ये रिक्त पदांचे ग्रहण आहे. सिंचन विभागाला गेल्या सात वर्षांपासून रेगुलर कार्यकारी अभियंता नाही. बांधकाम विभागाची स्थिती काही वेगळी नाही तेथेही पाच वर्षापासून प्रभारी पदभार आहे. ग्रामीण पाणीपरवठ्यालाही
कार्यकारी अभियंताचे पद जाऊन _येऊन आहे.
ग्रामीण भागातील जनतेच्या कामांवर याचा परिणाम जाणवतो. गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची देखील पदे रिक्त आहेत. निधी अखर्चित राहण्याचे प्रमाण वाढत आहे. कार्यरत असलेल्या यंत्रणेवर देखील प्रभाव पडत असल्याने त्यांच्यावर देखील ताण वाढतो. रिक्त पदांच्या बाबत प्रशासनाने आग्रही भूमिका घेणे गरजेचे आहे. एकट्या बुलढाणा जिल्हा परिषद यंत्रणेकडे दीड हजारावर पदे रिक्त असणे आणि राज्य शासनाच्या (स्टेटस डिपार्टमेंट ) अखत्यारित येणाऱ्या विभागांमध्येही रिक्त पदांची परिस्थिती सारखीच आहे.
रिक्त असलेली पदे तात्काळ भरावी अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आंदोलन करेल, याची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, तालुकाप्रमुख विजय इतवारे , किसानसेना उपजिल्हा प्रमुख अशोकमामा गव्हाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान हिवाळे, किरण दराडे, यांची उपस्थिती होती.