शेतकरी प्रश्नांवर आमदार श्वेताताईंनी सभागृहात उठवला आवाज! अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी...
Jul 3, 2025, 09:46 IST
मुंबई (लाइव्ह ग्रुप नेटवर्क):
२५ व २६ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील, विशेषतः चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळभाज्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारली, दोडका यांसारख्या हंगामी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला.
सध्या मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभापतींनी बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना बोलण्याची संधी दिली. यावेळी आमदार महाले यांनी चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करताना अतिशय ठाम आणि आक्रमकपणे नुकसानभरपाईची मागणी मांडली.
..फळभाज्यांचे उत्पादन उद्ध्वस्त...
वादळी वाऱ्यांमुळे कारली, दोडका आणि इतर फळभाज्यांचे वेल गारठून गेले, तर अनेक ठिकाणी पिके वाहून गेली. वैरागड, हरणी येथील कारली व दोडक्याच्या वेलांचे अतोनात नुकसान झाले असून, शेलगाव जहागीर आणि इतर गावांमध्ये अतिवृष्टीमुळे बांध फुटल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, आठही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी आमदार महाले यांनी केली.
...सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद...
आ. श्वेताताई महाले यांच्या मागणीची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आश्वासन दिले की, चिखली तालुक्यातील ज्या मंडळांमध्ये नुकसान झाले आहे, तेथे शासकीय नियमावलीनुसार तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात पोहोचवणारी कणखर भूमिका...
अनेकदा भाजीपाला व फळभाज्यांच्या पिकांवरील नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईसंदर्भात दुर्लक्ष केले जाते. मात्र आ. महाले यांनी या विषयाला केवळ लक्षवेधी म्हणून मांडले नाही, तर त्यावर तात्काळ उपाययोजनांची गरज अधोरेखित करत सरकारला कार्यवाहीसाठी प्रवृत्त केले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांसाठी आता निर्णायक पावले अपेक्षित...
सरकारने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण झाले, तर शेतकऱ्यांना सावरण्यास मदत होणार आहे. मात्र यासाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये जलदगतीने पंचनामे होणे आणि भरपाईचे वितरीकरण होणे आवश्यक आहे. आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नामुळे चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.