दुष्काळाच्या संकटात आमदार श्वेता महाले ॲक्शन मोडवर! पाणीटंचाई रोखण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावले; उदयनगरच्या पाणीप्रश्नावर अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती!

 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना लाखाची मदत, तर पशुधनासाठी १०५ क्विंटल चारा बियाण्यांचे वाटप; शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी महालेंचा पुढाकार!

 
 चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर पुढाकार घेतला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढण्यापूर्वीच संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सज्ज करण्याच्या उद्देशाने त्यांनी चिखली तहसील कार्यालयात सर्व संबंधित शासकीय यंत्रणांची विशेष समन्वय व आढावा बैठक घेतली. केवळ बैठका घेऊन कागदोपत्री अहवाल तयार करण्यात वेळ घालवू नका, प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष म्हणजे, उदयनगरच्या विस्कळीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा समोर येताच आमदार महाले यांनी संबंधित अभियंत्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या बैठकीत आमदार महालेंचा संवेदनशीलतेसोबतच कडक प्रशासकीय भूमिकेचाही प्रत्यय आला.चिखली विधानसभा मतदारसंघात संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी आमदार महाले यांनी आतापासूनच नियोजनावर भर दिला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनची प्रलंबित कामे, गावागावांतील जलस्रोतांची उपलब्धता, जनावरांसाठी चारा आणि शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत अशा विविध विषयांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी ओळखून समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार; प्रत्येकी एक लाखाचे धनादेश!

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची जाणीव ठेवत आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांसाठी ही मदत महत्त्वाचा आधार ठरणार आहे. शेतकरी कुटुंबांच्या दुःखात सहभागी होण्याबरोबरच त्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळवून देण्यावरही आमदार महाले यांनी भर दिला.

पशुधनाचीही काळजी; १०५ क्विंटल चारा बियाण्यांचे वाटप!

दुष्काळाचा फटका केवळ शेतीपिकांनाच नव्हे, तर पशुधनालाही बसण्याची शक्यता आहे. जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी आमदार महाले यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना तब्बल १०५ क्विंटल चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले. संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन आतापासूनच चारा उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शेतकऱ्यांसोबतच त्यांच्या पशुधनाच्या गरजांकडेही लक्ष देण्याची भूमिका आमदार महाले यांनी घेतली.

उदयनगरच्या पाणीप्रश्नावर आमदार महाले संतापल्या; अभियंत्यांना विचारला जाब!

बैठकीदरम्यान उदयनगर आणि परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची बाब समोर आली. त्यावर आमदार श्वेता महाले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून त्यासाठी नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत असेल, तर संबंधित यंत्रणेने त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना जाब विचारत त्यांनी अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास त्यांनी सांगितले.

कोलारा, भालगाव, आंधईसह अनेक गावांच्या पाणीपुरवठ्याचा घेतला आढावा!

कोलारा, भालगाव, आंधई, हातनी, उदयनगर, किन्होळा, ब्रह्मपुरी, महिमळ, श्रीकृष्णनगर यासह मतदारसंघातील विविध गावांमधील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आमदार महाले यांनी जाणून घेतली. उपलब्ध जलस्रोत, पाण्याची क्षमता, सुरू असलेल्या योजना आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.काही गावांमध्ये स्थानिक पातळीवरील समन्वयाअभावी पाणीपुरवठा योजना रखडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठका घ्या. स्थानिक अडचणी सोडवून रखडलेल्या योजना मार्गी लावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश!

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांचाही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. कोणत्या गावात किती काम पूर्ण झाले, कोणत्या ठिकाणी कामे अपूर्ण आहेत आणि ती रखडण्याची नेमकी कारणे काय आहेत, याची माहिती आमदार महाले यांनी घेतली.अपूर्ण कामांमधील अडथळे दूर करून योजनांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नियमित पिण्याचे पाणी पोहोचावे, यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी आतापासूनच तयारी करा; गरज पडल्यास टँकरचेही नियोजन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवश्यक उपाययोजना करीत असल्याचे सांगत आमदार महाले यांनी चिखली मतदारसंघातील प्रशासनालाही सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि पाणीपुरवठा विभागांनी समन्वयाने काम करावे. पिण्याचे पाणी, शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा आणि टंचाईग्रस्त गावांमध्ये पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था यांना प्राधान्य द्यावे. आवश्यकता भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजनही आधीच तयार ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

कागदावरची नव्हे, जमिनीवरची कामे दिसली पाहिजेत; महालेंची स्पष्ट भूमिका!

या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे आमदार श्वेता महाले यांनी केवळ शासकीय योजनांचा आढावा घेण्यापुरती भूमिका मर्यादित ठेवली नाही. प्रत्यक्ष गावपातळीवरील परिस्थिती, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि योजनांच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे यांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी ते संकट उद्भवूच नये, यासाठी आतापासून नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये आणि शेतकरी व पशुपालकांना वेळेत मदत मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार, दुसरीकडे पशुधनासाठी चारा बियाण्यांचे वाटप आणि त्याचवेळी भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना कामाला लावण्याचा आमदार महाले यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरत आहे. आता या बैठकीतील निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते, याकडे नागरिकांचे लक्ष असणार आहे.या महत्त्वपूर्ण बैठकीला तहसीलदार विजय सवडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, गटविकास अधिकारी समाधान वाघ, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे शंतनू बोन्द्रे, कृष्णकुमार सपकाळ, ओमसिंग राजपूत, अमोल साठे, संजय महाले, बळीराम काळे, संतोष काळे पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.