आमदार संजय गायवाडांकडून चूक मान्य...! म्हणाले......

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पूर्णाकृती स्मारकासह २१ महापुरुषांच्या १६ स्मारकांचे लोकार्पण उद्या १९ सप्टेंबरला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उद्याच्या सोहळ्याला उपस्थित राहणार असून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. दरम्यान काल, या सोहळ्याच्या पत्रिकेवरुन वाद निर्माण झाला होता. "सर्वजातीय महापुरुष" असा उल्लेख पत्रिकेवर असल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्ह ने प्रकाशित केल्यानंतर काँग्रेसने देखील या शब्दावर आक्षेप घेतला. अखेर स्वतः संजय गायकवाड यांनी देखील पत्रिकेत चूक झाल्याचे मान्य केले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलतांना आ.गायकवाड यांनी ही चूक मान्य केली.

 बुलडाणा नगर पालिका प्रशासनाकडून लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. या पत्रिकेत सुरुवातीलाच "सर्वजातीय महापुरुष" असा उल्लेख आहे. त्यामुळे काल "पांडे साहेब - तुम्हारा चुक्याच" अशा मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. प्रत्येक महापुरुष कुठल्या तरी विशिष्ट जातीत जन्माला आले असले तरी महापुरुषांचे कार्य हे संपूर्ण मानवजातीसाठी आहे, मात्र महापुरुषांचा सर्वजातीय असा उल्लेख करणे घोडचूक असल्याचे बुलडाणा लाइव्ह ने म्हटले होते. त्यानंतर काल दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने देखील या शब्दावर आक्षेप घेतला होता...
आ.संजय गायकवाड म्हणाले...
 दरम्यान काल रात्री एका वृत्तवाहिनीशी बोलतांना आ.संजय गायकवाड यांनी पत्रिकेत चूक झाल्याचे मान्य केले. ही चूक पत्रिका वाल्याकडून झाली. महापुरुषांनी सर्वच जाती धर्मांसाठी काम केले आहे. ही चूक लक्षात आली तेव्हा त्याला मी स्वतः अंडरलाईन करून बदल करायला सांगितला होता, मात्र तोपर्यंत पत्रिका छापून झाल्या होत्या असे आ.संजय गायकवाड म्हणाले.