बुलढाण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा! जुन्या आठवणींना उजाळा देताना शिवसैनिक झाले भावुक; बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार!

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आपल्या आक्रमक वक्तृत्वाने, परखड विचारांनी आणि सामान्य शिवसैनिकाला राजकीय ताकद देणाऱ्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणावर अमिट ठसा उमटवणारे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज, १७ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा आणि समाजकारणाचा वारसा अधिक ताकदीने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवसैनिकांनी आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतानाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब हे केवळ एका राजकीय पक्षाचे प्रमुख नव्हते, तर सामान्य माणसाला आत्मविश्वास देणारे आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवणारे असामान्य नेतृत्व होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांनी घालून दिलेला विचारांचा आणि समाजकारणाचा वारसा जपणे ही प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी संघटनात्मक कार्य अधिक जोमाने करण्याचे आवाहन केले.

अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद बाळासाहेबांनी दिली – ॲड. जयश्री शेळके

शिवसेनेच्या पक्षप्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी आपल्या मनोगतातून बाळासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. अन्याय, अत्याचार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवण्याची प्रेरणा बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिली. त्यांच्या विचारांची धार आजही तितकीच प्रभावी असून समाजातील अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची ताकद त्यांच्या विचारांतून मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारणाचा मंत्र जपण्याचा निर्धार!

जिल्हा सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने यांनी बाळासाहेबांच्या संघटनात्मक कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. शिवसेना ही केवळ राजकारणापुरती मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारी संघटना असली पाहिजे. बाळासाहेबांनी दिलेला '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' हा मूलमंत्र प्रत्येक शिवसैनिकाने तळागाळापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हा समन्वयक गजानन धांडे यांनी आगामी काळात बाळासाहेबांच्या विचारांना अभिप्रेत असलेली पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक गावात आणि प्रत्येक घटकापर्यंत शिवसेनेचे कार्य पोहोचवण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख अनिता जाधव यांनीही बाळासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला. महिलांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचे बळ बाळासाहेबांनी दिले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन महिला आघाडीच्या माध्यमातून संघटनेचे काम अधिक व्यापक केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 या अभिवादन सभेला उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, बुलढाणा तालुकाप्रमुख विजय इतवारे, उपतालुकाप्रमुख भावना पाटील, शहर संपर्कप्रमुख सुनील भाग्यवंत, शहरप्रमुख विजय राऊत, गणेश रिंढे, शाम सावळे, गजानन गवई, अरुण पाटील, श्रीकांत जाधव, निलेश हरकल, सोहिभाई, बबन खरे, मुंडे साहेब, अनिता गायकवाड, अर्चना शेळके, रत्ना शेळके, सुनीता कदम, श्रद्धा दाभाडे, भारती भारंबे, स्वाती लोंभेकर, रूपाली चव्हाण यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या विचारांशी निष्ठा राखण्याचा, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचा आणि शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा संकल्प यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.