बुलढाण्यात आरोग्य सेवेचा ‘मेगा बूस्ट’! १६ नवीन PHC, ५१ उपकेंद्रांची घोषणा; ना .जाधवांचा आरोग्य यंत्रणेला कडक इशारा! म्हणाले, हयगय करू नका...
Apr 23, 2026, 09:29 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना देणारा निर्णय जाहीर करत केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्यासाठी १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) आणि ५१ उपकेंद्रे सुरू करण्याची घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगत, “आरोग्य सेवा ही सर्वात मोठी सेवा असून ती सकारात्मक भावनेतून आणि सेवाभावाने करावी,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सध्या १ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, १ जिल्हा रुग्णालय, १४ ग्रामीण रुग्णालये, ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २८२ उपकेंद्रे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याने बालमृत्यू दर (८.०९) आणि माता मृत्यू दर (२३) कमी राखण्यात यश मिळवले असून आरोग्य क्षेत्रात प्रगतीची नोंद केली आहे.
मात्र, यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवत मंत्री जाधव यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी दिवसातून दोन वेळा बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचे निर्देश दिले. रिक्त पदे तात्काळ भरण्याचे आदेश देत आवश्यक मनुष्यबळासाठी मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शवविच्छेदन कक्ष, सीसीटीव्ही, फायर ऑडिट आणि गॅस ऑडिट अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले. सध्या असलेल्या ८ डायलेसिस केंद्रांबरोबरच भविष्यात प्रत्येक तालुक्यात डायलेसिस सेंटर व ब्लड बँक उभारण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले.
कोव्हिड काळातील निष्क्रिय पडलेले बेड्स व ऑक्सिजन टँक तात्काळ वापरात आणण्याचे आदेश देताना, “रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागणे ही गंभीर बाब आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, टीबी निर्मूलन, मानसिक आरोग्य, तसेच महिलांसाठी HPV लसीकरण यावर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. ‘निक्षय मित्र’ योजनेत अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन टीबी रुग्ण दत्तक घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले.
कर्करोग तपासणी मोहिमेला गती देत ३० वर्षांवरील प्रत्येक महिलेची तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. तसेच ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हेल्थ कार्ड पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले.ग्रामीण भागातील दूषित पाणीपुरवठा, औषधांची उपलब्धता आणि रुग्णांना अनावश्यक रेफर करण्याच्या प्रकारांवरही त्यांनी नाराजी व्यक्त करत तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला, तर कामात कुचराई करणाऱ्यांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिते यांनी प्रास्ताविकात बुलढाणा जिल्हा आरोग्य सेवेत राज्यात अग्रेसर असल्याचे सांगत, ‘माझा गाव आरोग्य संपन्न’ अभियानासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.