"बळीराजासाठी चांगला पाऊस पडू दे, सर्वांना निरोगी आयुष्य लाभू दे" — केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे विठ्ठल चरणी साकडे! ना.जाधवांची ४३ वी वारी....
Updated: Jul 7, 2025, 09:00 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा आयुष मंत्रालयाच्या स्वतंत्र प्रभाराचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरात विठ्ठलाच्या चरणी सपत्नीक नतमस्तक झाले. सर्व देशवासीयांना आरोग्य, बळीराजाला समाधान आणि चांगला पाऊस लाभो अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाकडे केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दिंड्यांसह पंढरपुरात एकत्र झाले. त्याच भक्तिमय वातावरणात, देशाच्या मंत्रीमंडळातील बुलडाण्याचे प्रतिनिधी ना .प्रतापराव जाधव यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. “देशातील प्रत्येक नागरिक निरोगी राहो, अन्नदात्याला भरघोस उत्पन्न मिळो, आणि पावसाने कृपा करावी,” असे साकडे त्यांनी विठ्ठल चरणी घातले.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी प्रतापराव जाधव हेही उपस्थित होते. भाविकांच्या गर्दीत सामील होत त्यांनी देखील विठ्ठल-माऊलीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
सलग ४३ वी वारी: श्रद्धेचा अद्वितीय प्रवास....
प्रतापराव जाधव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त म्हणून ओळखले जातात. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात खंड पडला, तरी गेल्या ४३ वर्षांपासून त्यांनी आषाढी एकादशीला विठ्ठल चरणी हजेरी लावली आहे. यंदाची वारी ही त्यांच्यासाठी श्रद्धेची ४३ वी वारी होती. केवळ मंत्री म्हणून नाही, तर एक वारकरी म्हणून त्यांनी ही सेवा बजावली.