शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे सामुहिक रजा आंदाेलन; बाेगस शालार्थ प्रकरणात शिक्षण विभागातील अटकेचा निषेध; एसआयटीचा अहवाल येईपर्यंत पुढील कारवाई न करण्याची मागणी..!
Aug 8, 2025, 14:35 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :राज्यभर गाजत असलेल्या बाेगस शालार्थ प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना हाेत असलेल्या अटकेच्या निषेधार्थ राज्यभरातील शिक्षण सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी ८ ऑगस्ट पासून सामुहिक रजा आंदाेलन सुरू केले आहे. राज्य शासनाने एसआयटी स्थापन केली आहे. या एसआयटीचा अहवाल येईपर्यंत कारवाई करू नये, अशी मागणी ८ ऑगस्ट राेजी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. बुलढाण्यातील शिक्षण विभागाचे अधिकारीही या आंदाेलनात सहभागी झाले आहेत.
बोगस शालार्थ प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर अन्यायकारक अटकेचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाने १ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारले हाेते. बुलढाणा जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले हाेते. या निवेदनात ८ ऑगस्टपासून सामुहिक रजा आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. त्यानुसार राज्यभरातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सामुहिक रजा आंदाेलन सुरू केले आहे.
मागील काही महिन्यांपासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरण चर्चेत असून, काही अधिकाऱ्यांना विनाचौकशी अटक करण्यात आली आहे. या पद्धतीने झालेल्या अटकेचा संघटनेने तीव्र निषेध केला आहे.
राजपत्रित अधिकारी म्हणून हे अधिकारी प्रामाणिकपणे शासनाची कामे करत असून, त्यांच्यावर जर काही दोष आढळला तर त्यासाठी नियमानुसार विभागीय चौकशीची तरतूद आहे. मात्र, "चोर सोडून संन्याशाला फाशी" या म्हणीप्रमाणे तपास यंत्रणा कार्यरत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे, शासनाने विनाचौकशी अटकेपासून संरक्षणाची लेखी हमी द्यावी, एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षक-शिक्षकेत्तर वेतन देयकांवर सह्या करण्यात येणार नाहीत, अतिरिक्त सुट्ट्यांच्या दिवशी लादण्यात येणाऱ्या अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यात यावा आदी मागणी निवेदनात करण्यात आल्या हाेत्या.त्यानंतर ८ ऑगस्टपासून सामुहिक रजा आंदाेलन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वच शिक्षणाधिकारी इतर अधिकारी रजेवर गेले आहेत. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल अकाळ,शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील, शिक्षणाधिकारी याेजना डाॅ. वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी ए.पी.देवकर, वेतन पथक अधीक्षक ए.जी.निवालकर, प्रकाश कुळे, ए. के. वाघ यांच्यासह इतरांची स्वाक्षरी आहे.