मराठी भाषा पंधरवडा ! जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम

 
 बुलढाणा (जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यभरात मराठी भाषा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून मंगळवारी दि. 28 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन व विक्री’चे आयोजन करण्यात आले आहे. यासह 'ग्रंथदान' हा उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे.
हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन भूसंपादन इमारतीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमींनी लाभ घ्यावा. तसेच ‘ग्रंथदान’ उपक्रमात सहभागी होवून कमीत कमी एक पुस्तक इतर वाचकांसाठी दान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 
दानरूपी पुस्तके दि. 28 जानेवारी रोजी पुस्तक प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाच्या ठिकाणी नवीन भूसंपादन इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वीकारण्यात येतील, असे कळविण्यात आले आहे.