अतिक्रमणधारक व नवव्यवसायिकांसाठी गाळे उपलब्ध करून द्या! भाजपकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन! शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांचा पुढाकार...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील पहिलं निवेदन आज नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं. हे निवेदन शहरातील अतिक्रमणधारक आणि नवव्यवसायिकांना गाळे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सादर करण्यात आलं.

सन २०१४-१५ पासून बुलढाणा शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असून, त्यानंतर अनेक वेळा अतिक्रमणधारकांची अधिकृत नोंदणी करण्यात आली होती. नगरपरिषदेच्या माध्यमातून काही गाळे बांधण्यात आले आणि काही अतिक्रमणधारकांना वितरीतही करण्यात आले, मात्र गाळ्यांची संख्या आणि पात्र लाभार्थ्यांमध्ये मोठी तफावत दिसून आली.
सद्यस्थितीत बांधकाम सुरू असलेल्या गाळ्यांपैकी किती गाळे नोंदणीकृत अतिक्रमणधारकांना मिळणार, तर काही गाळे नगरपरिषदेच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने खुल्या हराशीद्वारे दिले जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती पारदर्शकतेने दिली जावी, आणि येणाऱ्या काळात जे गाळे पूर्ण होतील त्यामध्ये नोंदणीकृत अतिक्रमणधारक व नव्यवसायिकांना प्राधान्य दिलं जावं, या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे हे निवेदन सादर केलं.
या निवेदनप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष मंदार बाहेकर, कामगार आघाडीचे राज्य सचिव विश्राम पवार, नगरपरिषदेतील भाजप गटनेते अरविंद होंडे, ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीप सोनटक्के, युवा पदाधिकारी स्फूर्तीदीप ठाकरे, करण बेंडवाल, निलेश गायकवाड, नितीन नरवाडे, विजय मखरे आदींची उपस्थिती होती.
भाजपने अतिक्रमणधारक व नव्यवसायिकांच्या प्रश्नांप्रती गांभीर्याने घेतलेली भूमिका लक्षात घेता, या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.