लाडकी बहीण योजनेत बनवाबनवी; मावशीच्या नावाने लाडक्या भावानेच लाटला लाभ नाव-फोटो मावशीचे, आधार-खाते स्वतःचे लावून केला जुगाड; आता करावे लागणार पैसे परत..!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण याेजनेचा लाभ घेतल्याचे समाेर आल्यानंतर आता आणखी एक बनवा बनवी समाेर आली आहे. एका पुरुषाने आपल्या मावशीचे नावावर लाडक्या बहीण याेजनेचे १५०० रुपये लाटल्याचे समाेर आले आहे. हा तरुण वाशिम जिल्ह्यातील असून त्याची मावशी मेहकर तालुक्यातील जवळा येथील आहे.या प्रकाराने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे या तरुणाने आपल्या मावशीचे नाव आणि फोटो वापरून स्वतःचा आधार व बँक खाते जोडत दीड हजार रुपये प्रतिमाह असा लाभ घेतल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले आहे. 

मेहकर तालुक्यातील जवळा येथील महिलेच्या मुलीचा मुलगा  वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोप गावात राहताे. मुख्यमंत्री लाडकी बहीण याेजनेचा अर्ज भरण्यासाठी मावशीने बहीणीच्या मुलाकडे कागदपत्रे दिली हाेती. हा भाचा ग्राहक सेवा केंद्रावर काम करतो. त्याने मावशीच्या नावाने अर्ज भरून, नावासमोर तिचा फोटो जोडला, परंतु आधार क्रमांक स्वतःचा लावला. त्यामुळे अर्ज मंजूर झाला आणि त्याला दीड हजार रुपये प्रतिमाह लाभ मिळू लागला. लाभार्थी म्हणून त्या भाच्याच्या नावासमोर ‘मिस’ असा उल्लेख दिसत होता. हे पाहून अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
१६ हजार ५०० रुपयांचा घेतला लाभ 
जुलै महिन्यात शासनाने पडताळणी सुरू केल्यानंतर अशा अनेक फसवणुकींचे प्रकार बाहेर येऊ लागले आहेत. महिलांसाठीच्या या योजनेतील पैशांवर काही पुरुषांनी डल्ला मारल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात भाच्याने एकूण १६ हजार ५०० रुपये असा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. लाभाची रक्कम थांबल्यानंतर मावशीने विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला.