तांदुळवाडी येथे मोठी घरफोडी; ६ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास; साखरखेर्डा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच...
Dec 12, 2025, 12:11 IST
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : साखरखेर्डा व शिंदी येथे झालेल्या चोरीनंतर आता तांदुळवाडी येथेही चोरट्यांनी धुमाकूळ घालत ४ डिसेंबरच्या रात्री मोठी घरफोडी केली आहे. या घरफोडीत ६ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील तांदुळवाडी येथे अंकुश शालीग्राम आकाळ (मॅनेजर, सेंट्रल बँक, चिखली) यांच्या राहत्या घरात ४ ते ५ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा आणि कुलूप तोडून प्रवेश केला. घटनेची माहिती शालीग्राम आकाळ यांच्या लक्षात आली.
अपघाताच्या वेळी शालीग्राम आकाळ हे आपल्या चुलत बहिणीकडे, भोरसा भोरसी येथे कुंकवाच्या कार्यक्रमाला गेले होते. ५ डिसेंबर रोजी किराणा व भाजीपाला खरेदीसाठी साखरखेर्डा येथे आले असता पैसे कमी पडल्याने ते तांदुळवाडी येथील घरी परतले. घराचे कुलूप तोडलेले दिसताच त्यांना चोरीची शंका आली.
घरात प्रवेश केला असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले. पेटी उघडून पाहिल्यावर त्यातील ४० हजार रुपये रोख रक्कम गायब होती. दुसऱ्या खोलीतही सामान अस्ताव्यस्त आढळले. त्यांनी तत्काळ अंकुश आकाळ यांना फोनवर माहिती दिली.
त्यानंतर आई व चुलत भावासह ते तांदुळवाडीत पोहोचले.
घरातील बेडरूममध्ये तपास केला असता लोखंडी पेटीत ठेवलेले चांदीचे ५ तोळे दागिने (किंमत ५ हजार रुपये), लहान मुलांचे दागिने (किंमत १० हजार रुपये), सौभाग्यवती पोत (५ तोळे, किंमत ५ लाख ५५ हजार रुपये), नगद ३ हजार रुपये असा एकूण ६ लाख १३ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणाची तक्रार साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी अंकुश शालीग्राम आकाळ यांनी केली आहे.
