मलकापूरमध्ये केमिकल कंपनीत मोठी दुर्घटना! अंगावर रसायन उडाले, ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दसरखेड एमआयडीसी परिसरातील बॅझो केमिकल कंपनीत काम करत असताना अंगावर केमिकल उडाल्याने ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव ललित महादेव वाघ (वय ३२, रा. चाळीसबिघा परिसर, मलकापूर) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ललित वाघ हे दसरखेड एमआयडीसीतील बॅझो केमिकल कंपनीत कामावर होते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास काम सुरू असताना त्यांच्या अंगावर हॉल्टमधून केमिकल उडाले. रसायन अंगावर उडाल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

घटनेनंतर त्यांना तातडीने मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले; मात्र काही वेळाने त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान ललित वाघ यांचा मृत्यू झाला.

फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी

घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने व माहिती संकलित केली आहे.

ललित वाघ यांच्या अंगावर नेमके कोणते केमिकल उडाले? त्यांचा रसायनाशी किती प्रमाणात संपर्क झाला? तसेच मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण काय? याचा तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, ललित वाघ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या घटनेमुळे दसरखेड एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून, मलकापूर शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.