जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध पालकमंत्री मकरंद पाटील यांची महाराष्ट्र दिनी माहिती; जिल्हा मुख्यालय केले पार पडला ध्वजारोहणाचा कार्यक्रम....
Updated: May 1, 2025, 15:20 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सर्वांनी समन्वयाने काम करून बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या शिखरावर नेऊया, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी महाराष्ट्र दिनी केले. 1 मे रोजी पोलिस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, माजी आमदार विजयराज शिंदे, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील यांनी कृषीविषयक योजनांची माहिती देताना सांगितले की, महात्मा गांधी रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत ४ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. सिंचनासाठी विविध योजनांतर्गत ७९ कोटींचे अनुदान आणि पीक विमा योजनेंतर्गत १४४ कोटी रुपये वितरित करण्यात आले. नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४९० कोटींचा निधी मिळाला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ३.५ लाख शेतकऱ्यांना १९वा हप्ता मिळाला असून फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी तो त्वरित तयार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनांबाबत त्यांनी सांगितले की, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ आणि ‘गाळमुक्त धरण’ योजनेतून १०९ प्रकल्पांमध्ये गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत ४०१ मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून २ हजार एकरात ९१ उपकेंद्रे उभारली जात आहेत.
रुफटॉप सोलर पॅनल्स व प्रधानमंत्री कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा लाभ मिळतो आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजनेतून ७७ हजार घरकुलांची कामे पूर्ण किंवा प्रगतीपथावर आहेत.
‘सहज प्रणाली’च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे महसुली दस्तऐवज एका क्लिकवर उपलब्ध होत असून ‘जिवंत सातबारा’ ही जिल्ह्यातून सुरू झालेली योजना आता संपूर्ण राज्यात राबवली जात आहे. जिल्ह्यातील ४५८ शेतरस्ते खुले करण्यात आले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या गुंतवणूक परिषदेत ८६ सामंजस्य करारांद्वारे ६३१ कोटींची गुंतवणूक आणि ३ हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बुलढाणा जिल्हा विभागात प्रथम आणि राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस विभागाच्या पथसंचलनाने कार्यक्रमात रंगत आणली. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.