मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ.सिद्धार्थ खरातांवर भडकले! पहिल्यांदा निवडून आलात,शिस्त पाळा..! .. तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही म्हणाले...! नेमकं काय घडलं?
Dec 15, 2025, 09:18 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला. नागपुरातील हिवाळी अधिवेशन कमी दिवसाचे ठेवल्यामुळे विरोधी पक्षांनी, विशेषतः विदर्भातील आमदारांनी आधीपासूनच नाराजी दर्शवली होती. दरम्यान काल, मेहकर चे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विदर्भाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग, गुंतवणूक आणि भविष्यातील योजनांची माहिती देत होते. त्याचवेळी विदर्भासाठी आणि विशेषता बुलढाणा जिल्ह्यासाठी नेमके काय मिळाले? असा थेट सवाल आ.सिद्धार्थ खरात यांनी केला..या मुद्द्यावर सभागृहात सुमारे दोन मिनिटे गोंधळ उडाला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धार्थ खरात यांना सभागृहाची शिस्त पाळण्याचा सल्ला दिला. आपण पहिल्यांदा निवडून आला आहात अशी आठवण करून देत विदर्भाला काय दिले याची मागील काळाशी तुलना करायची झाल्यास तोंड दाखवायला जागा राहणार नाही असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले...
या घडल्या प्रकरणांत सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार खरात म्हणाले, मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रासाठी काय केले ते सांगत आहेत; मात्र विदर्भाला त्याचा किती लाभ झाला? माझ्या बुलढाणा जिल्ह्याला काय मिळाले? मेहकरसाठी नेमके काय दिले, असे प्रश्न मी उपस्थित केले. मुख्यमंत्री विदर्भाचे नेतृत्व करतात आणि गुंतवणूक आणतात, याचा आम्हालाही अभिमान आहे.
मात्र ७ ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या घोषणांव्यतिरिक्त शेतकरी, रोजगार किंवा औद्योगिक विकासासाठी कोणतीही नवी, ठोस घोषणा झालेली नाही. भविष्यात विमानतळ, रस्ते आणि पायाभूत सुविधा उभारल्या जाणार असल्याच्या घोषणांचे स्वागत आहे; परंतु यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढणार आहे का? युतकांना रोजगार मिळणार आहे का आणि मागास जिल्ह्यांचा औद्योगिक विकास होणार आहे का, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न सुमारे तीन लाख रुपये आहे, तर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अवघ्या एक लाख रुपयांच्या आसपास आहे. हा फरक कसा भरून काढणार, असा सवाल उपस्थित करत मागास जिल्ह्यांना औद्योगिक विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे गरजेचे असल्याचे खरात यांनी स्पष्ट केले.
