लोणारमध्ये २८८ मिमी पावसाची नोंद; जुनी भिंत काेसळल्याने लाखाेंचे नुकसान! ढगफुटीसदृश्य पावसाने पिके गेली वाहुन : शेतकऱ्यांवर आणखी एक संकट..!
Jul 22, 2025, 14:31 IST
लाेणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहर व परिसरात २२ जुलै राेजी रात्री एक वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने लोणार शहरात हाहाकार माजवला. आज दिवसभरात २८८ मिमी तर आतापर्यंत एकूण ६३३ मिमी (सुमारे 11-12 इंच) पावसाची नोंद झाली आहे.या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेकडाे हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत.
या मुसळधार पावसामुळे रात्री तीन वाजेच्या सुमारास संतोष रामकृष्ण शेडूते यांच्या ८० फूट लांब आणि १० फूट उंच अशी जुनी दगड, सिमेंट व विटांची भिंत कोसळली. भिंतीजवळच असलेल्या शेजाऱ्यांच्या वाहनांचे आणि साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सिराज हुसेन शेख यांची हिरो कंपनीची एचएफ डीलक्स (२०१६ मॉडेल) दुचाकी, महबूब शेख रऊफ यांची बजाज डिस्कवर दुचाकी, नसीर खान यांची दोन हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या सिंटेक्स टाक्या, तसेच शेख समीर शेख अब्बास यांची एक हजार लिटरची पाण्याची टाकी भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने सुमारे दाेन ते अडीच लाख रुपयांचे एकूण नुकसान झाले आहे, अशी माहिती संतोष शेडूते यांनी दिली.

तसेच गजानन जगदेवराव जाधव यांच्या माळवद माडी बांधकाम असलेल्या घराची भिंतही पावसामुळे माळवद माडीसह कोसळली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणारचे तलाठी सचिन शेवाळे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यांनी नुकसानग्रस्तांना शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी परिसराची पाहणी करत इतर नागरिकांचेही काही नुकसान झाले आहे का, याची चौकशी केली.या वेळी प्राध्यापक गजानन जाधव, संतोष शेडूते तसेच अन्य नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते.