लोणार( सचिन गोलेच्छा: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पृथ्वीवरच्या एकमेव उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर, जागतिक वारसा लाभलेलं ऐतिहासिक शहर... पण आज हेच शहर घाणीच्या साम्राज्यात अडकलेलं आहे.
नगरपरिषदेवर प्रशासक राज आल्यानंतर शहराची अवस्था अक्षरशः ढासळली आहे. इतिहासाची कीर्ती लाभलेल्या या नगरीत आज सांडपाणी, खड्डे, मातीचे ढिगारे, फुटलेले रस्ते आणि दुर्गंधीने हैराण झालेले नागरिक – अशी स्थिती आहे. धार्मिक स्थळांच्या आसपाससुद्धा अस्वच्छतेचं साम्राज्य आहे, आणि नगरपालिका मात्र झोपेत आहे...
नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहर समस्यांचे माहेरघरच झाले आहे. रस्ते फुटलेले, नाल्या तुंबलेल्या आणि कचऱ्याचे ढिगारे जागोजागी पडलेले दिसतात. इतकेच नव्हे तर नाल्यांतील पाणी सरळ रस्त्यांवर वाहू लागले आहे. अवकाळी पावसामुळे नगरपालिकेची ‘स्वच्छता मोहीम’ धुळीत गेल्याचे चित्र नागरिक अनुभवत आहेत.
Related img.
शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, नाक दाबून चालावे लागते, अशी वेळ आली आहे. नागरिकांचा संयम सुटू लागला आहे, पण पालिकेचे अधिकारी मात्र अजूनही ‘जुनेच चालू द्या’ या भूमिकेत अडकून बसले आहेत.
Related img.
प्रशासक आहे पण प्रशासन कोठे?
नगरपरिषदेकडे सध्या कोणतेही लोकप्रतिनिधी नाहीत. पण त्याचाच गैरफायदा घेत अधिकारी आणि कर्मचारी मंडळी बेपर्वा बनले आहेत. यामुळे नागरिकांना समस्या सांगायला कोणी नाही, ऐकायला कोणी नाही आणि उपाय करायला कोणी नाही, अशी दुर्दैवी अवस्था आहे.