विकासाचा दुवा : जालिंदर बुधवंत यांच्या रूपाने ‘कामाचा’ माणूस जिल्हा बँकेत अविरोध; सोयगावच्या ग्रामपंचायतीपासून जिल्हा बँकेपर्यंत चढती कमान!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत काल, ११ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपली आणि १२ उमेदवारांची अविरोध निवड निश्चित झाली. विशेष म्हणजे हे सर्व १२ उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनल’चे आहेत. या अविरोध निवडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांचा समावेश झाल्याने त्यांच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील कामाची पुन्हा एकदा दखल घेतली गेल्याचे मानले जात आहे.

बुधवंत हे विमुक्त जाती-भटक्या जमाती राखीव मतदारसंघातून सहकार पॅनलचे उमेदवार होते. या मतदारसंघातून तब्बल १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, बुधवंत यांच्या नावावर एकमुखी संमती दाखवत उर्वरित ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे बुधवंत यांची जिल्हा बँकेवरची निवड अविरोध झाली.

आडवळणाच्या सोयगावपासून जिल्हा बँकेपर्यंत...

जालिंदर बुधवंत यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर ही अविरोध निवड त्यांच्या प्रदीर्घ वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. आडवळणाच्या सोयगाव गावातून ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच म्हणून सुरू झालेली त्यांची राजकीय वाटचाल धाड सोसायटीचे सदस्य, सभापती, बाजार समिती संचालक व सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचली.

गेल्या सलग १२ वर्षांपासून शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना बुधवंत यांनी पक्ष संघटनेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आक्रमक राजकारणापेक्षा संयमी स्वभाव, सातत्य आणि कामावर भर देणारा चेहरा अशी त्यांची प्रतिमा त्यांच्या समर्थकांमध्ये पाहायला मिळते.

बाजार समितीत ‘काम’ करून दाखवले!

बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या कार्यकाळात बुधवंत यांनी विकासकामांच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला. बाजार समितीच्या कारभाराला आधुनिक स्वरूप देण्यासोबतच विविध व्यवहारांना चालना देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाला.विशेष म्हणजे, बाजार समितीचे व्यवहार जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये बुधवंत यांनी पुढाकार घेतला. बाजार समितीचा पेट्रोल पंप असो किंवा इतर आर्थिक व्यवहार, ते जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू झाल्याने बँकेच्या व्यवहारांनाही चालना मिळाली.

 जिल्हा बँक काही कथित कारणास्तव व्यवहार रूपाने अडचणी झाली होती.  तेव्हा देखील बँकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत उपस्थिती लावून काय केलं पाहिजे यासाठी पोट तिडकेने बोलणारे जालिंदर बुधवत होते. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर बँकेची डिपॉझिट वाढवण्याच्या दृष्टीने आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या विविध संस्थांचे व्यवहार हे जिल्हा बँकेत त्यांनी प्रामुख्याने सुरू केले. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे पेट्रोल पंप असेल किंवा  बाजार समितीचे सर्व विविध व्यवहार जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू झाल्याने संस्थात्मक व्यवहार वाढण्यास हातभार लागला. त्यामुळे सहकार क्षेत्रात ‘विकासाचा दुवा’ साधणारा कामाचा माणूस म्हणून बुधवंत यांच्या कार्यपद्धतीकडे पाहिले जाते.

९ जणांनी माघार घेतली; बुधवंतांच्या नावावर एकमत

विमुक्त जाती-भटक्या जमाती राखीव मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात होते. मात्र निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात बुधवंत यांच्या नावावर एकमत झाले आणि तब्बल ९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे कोणतीही निवडणूक न लढवता बुधवंत जिल्हा बँकेत पोहोचले. या मतदारसंघातून त्यांचे सूचक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक गजानन धांडे होते हे विशेष! 

बुधवंत यांची ही अविरोध निवड केवळ एका जागेचा निकाल नसून, गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळत कामाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या विश्वासाची पावती म्हणून त्यांच्या समर्थकांकडून पाहिली जात आहे.

आता जिल्हा बँकेत ‘कामाचा’ ठसा उमटवण्याची संधी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १२ उमेदवार अविरोध निवडून आले असून उर्वरित ९ जागांसाठी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत जालिंदर बुधवंत यांच्यासारखा बाजार समिती आणि सहकार क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव असलेला चेहरा जिल्हा बँकेत पोहोचला आहे.

ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झालेला प्रवास आता जिल्ह्याच्या महत्त्वाच्या सहकारी बँकेच्या संचालक मंडळापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ‘पद मिळविण्यापेक्षा कामातून पदाला अर्थ देणारा चेहरा’ अशी बुधवंत यांची ओळख आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणखी व्यापक होणार का, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.