विजेचा तांडव! गुरांना चारापाणी करण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलावर वीज पडली! बापाच्या डोळ्यादेखत मुलावर काळ कोसळला! मामाचा मुलगा जखमी; लोणार तालुक्यातील घटना
Updated: May 17, 2025, 20:50 IST
बीबी(श्रीकृष्ण पंधे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. यादरम्यान विजांचा गडगडाट देखील होत आहे. लोणार तालुक्यातील हिवराखंड गावात आज,१७ मे रोजी सायंकाळी वीज पडल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. याशिवाय मृतक मुलाच्या मामाचा मुलगा या घटनेत किरकोळ जखमी झाला. गुरांचा चारापाणी करण्यासाठी गेलेले असताना ही दुःखद घटना घडली.
शंकर प्रभू खंड(१५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अंबादास लबडे (१६, रा. लेंडी पिंपळगाव) हा किरकोळ जखमी झाला आहे. शंकर व त्याच्या मामाचा मुलगा अंबादास हे वडील प्रभू खंड यांच्यासोबत गुरांचा चारापाणी करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी अचानक वीज कोसळली यात वडिलांच्या डोळ्यादेखत शंकराचा मृत्यू झाला तर अंबादास हा जखमी झाला आहे.