‘लबाडाचं आमंत्रण, जेवल्याशिवाय काही खरं नाही!’; शेतकरी मदतीवरून उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवतांचा सरकारवर हल्लाबोल!

 उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उबाठा शिवसेनेचा मोर्चा; शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सरकारच्या नुकत्याच जारी झालेल्या शासन निर्णयावर तीव्र टीका केली आहे.


सरकारने काढलेला जीआर म्हणजे ‘लबाडाचं आमंत्रण, जेवल्याशिवाय काही खरं नाही!’, अशा शब्दांत बुधवत यांनी सरकारवर निशाणा साधला. या जीआरमध्ये शेतकऱ्यांना ठोस आर्थिक मदत किती देणार, हेक्टरी ५० हजार रुपये किंवा एक लाख रुपये मदत देणार का, याबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याचा आरोप त्यांनी केला.“नुसता जीआर काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम सरकारने केले आहे,” अशी टीका बुधवत यांनी केली. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदतीची रक्कम जमा होईपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मदत मिळेपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही’

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणे गरजेचे असून केवळ कागदावरील घोषणा करून प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका बुधवत यांनी मांडली. २९ सप्टेंबरचा मोर्चा ही केवळ सुरुवात असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत, शेतकऱ्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खा.अरविंद सावंत, उपनेते आमदार नितीन देशमुख येणार..

उद्याच्या मोर्चाला ठाकरे शिवसेनेचे नेते खा.अरविंद सावंत आणि उपनेते आमदार नितीन देशमुख संबोधित करणार आहेत. यामुळे उद्याच्या मोर्चाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे...